कासेम सुलेमानी हत्येप्रकरणी इराणचे अमेरिकेच्या 51 जणांवर निर्बंध

कासेम सुलेमानीतेहरान – दोन वर्षांपूर्वी इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख मेजर जनरल कासेम सुलेमानी यांच्यावरील कारवाईत सहभागी असलेल्या अमेरिकेच्या 51 जणांवर इराणने निर्बंध लादले आहेत. यामध्ये अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख, सेंटकॉमचे प्रमुख तसेच माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा समावेश आहे. सुलेमानी यांची हत्या म्हणजे अमेरिकेचा दहशतवादी हल्ला असल्याची टीका इराणने केली. व्हिएन्ना येथे अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू असताना इराणने ही कारवाई करून अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला धक्का दिल्याचे दिसते.

अमेरिकेचे आधीचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाने सुलेमानी यांना ठार करण्यात आले असले तरी बायडेन प्रशासन त्याची जबाबदारी झटकू शकत नाही, असे इराणने काही दिवसांपूर्वी बजावले होते. इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना यावरून गंभीर परिणामांची धमकी दिली होती. तर इराणच्या आणखी एका धार्मिक नेत्याने अमेरिकेसह इस्रायललाही धमकावले होते.

शनिवारी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या 51 जणांवर सुलेमानी यांच्या हत्येप्रकरणी, दहशतवादी कारवाई आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप करून निर्बंध लादले. यामध्ये अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिली, सेंट्रल कमांडचे (सेंटकॉम) प्रमुख जनरल केनिथ मॅक्केन्झी यांचा समावेश आहे. तसेच माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे तत्कालिन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन आणि सुरक्षा समितीचे माजी प्रमुख रॉबर्ट ग्रीनवे यांच्यावर निर्बंधांची कारवाई केली.

कासेम सुलेमानीयानुसार निर्बंध टाकण्यात आलेल्या अमेरिकी अधिकाऱ्यांची इराणमधील संपत्ती जप्त केली जाऊ शकते. पण या अमेरिकी अधिकाऱ्यांची इराणमध्ये कुठल्याही प्रकारची मालमत्ता असण्याची दूरान्वयेही शक्यता नाही. त्यामुळे इराणची ही कारवाई प्रतिकात्मक ठरते. या निर्बंधांद्वारे इराण बायडेन प्रशासनाला इशारा देत असल्याचे अमेरिकेतील आघाडीच्या माध्यमांचे म्हणणे आहे. गेल्या काही आठवड्यांपासून व्हिएन्ना येथे इराणबरोबर अणुकराराबाबत अमेरिका व युरोपिय देशांची चर्चा सुरू आहे. इराणने केलेल्या मागण्यांमुळे सदर अणुकरार रखडला आहे. अमेरिकेने आपल्या मागण्या अमान्य केल्यास यापुढे आणखी मोठी कारवाई करण्याचा इशारा इराणने या निर्बंधांच्या कारवाईद्वारे दिल्याचे अमेरिकी माध्यमांचे म्हणणे आहे.

मात्र अमेरिका आणि इराणमध्ये अणुकरार झाल्याचे दावे केले जात आहेत. लंडनस्थित ‘राय अल-यूम` या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अमेरिका व इराणमध्ये दोन वर्षांचा अंतरिम अणुकरार झाला आहे. यानुसार, बायडेन प्रशासन इराणवरील सर्व निर्बंध मागे घेण्यास तयार आहे. त्याच्या मोबदल्यात इराणने आपल्या अणुप्रकल्पातील प्रगत युरेनियमचा साठा रशियाकडे सोपवावा, असे या कराराद्वारे निश्‍चित करण्यात आल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केला. इस्रायलच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही बातमी उचलून धरली. पण इराणने सदर बातमी नाकारली असून हे दावे पूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले आहे.

leave a reply