रियाध/वॉशिंग्टन – लवकरच किंवा अगदी ४८ तासात इराण सौदी अरेबियावर हल्ला चढविणार असल्याचे सौदीच्या गुप्तचर यंत्रणेने अमेरिकेला कळविले होते. त्यानंतर बायडेन प्रशासनाने आखाती क्षेत्रात तैनात असलेल्या आपल्या जवानांच्या सुरक्षेसाठी अमेरिका विशेष अधिकारांचा वापर करील, असे बजावल होते. गेल्या काही दिवसांपासून इराणच्या सौदीवरील हल्ल्याबाबत बातम्या येत आहेत. इंधन उत्पादनात कपातीचा निर्णय मागे घेण्याची अमेरिकेची मागणी नाकारणाऱ्या सौदीला याची किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा बायडेन प्रशासनाने दिला होता. तसेच सौदीला अमेरिकेने पुरविलेले संरक्षण मागे घ्या, अशी मागणी अमेरिकन सिनेटर्स करू लागले आहेत. त्यामुळे इराणचा संभाव्य हल्ला म्हणजे सौदीला चुकती करावी लागणारी ती किंमत असण्याची दाट शक्यता यामुळे समोर येत आहे.
गेल्या सहा आठवड्यांहून अधिक काळ इराणमध्ये निदर्शने सुरू आहेत. यामागे अमेरिका, इस्रायल या देशांबरोबरच सौदीच्या गुप्तचर यंत्रणेचाही हात असल्याचा आरोप इराणने केला होता. सौदीच्या राजवटीला याची किंमत चुकती करावी लागेल, अशी धमकी इराणने दिली होती. त्या पार्श्वभूमीवर, पाश्चिमात्य माध्यमांमध्ये इराण सौदीवर हल्ला चढविण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. सौदीच्याच गुप्तचर विभागाने तशी माहिती अमेरिकेला दिल्याचा दावा माध्यमांमध्ये आला होता. पण आता पेंटॅगॉनने त्यावर प्रतिक्रिया दिल्याने या दाव्याचे गांभीर्य वाढले आहे.
पेंटॅगॉनचे माध्यमसचिव ब्रिगेडिअर जनरल पॅट रायडर यांनी आखातातील धोक्याबाबत अमेरिकेला चिंता वाटत असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘पेंटॅगॉन सौदीतील सहकाऱ्यांच्या संपर्कात आहे. आधी सांगितल्याप्रमाणे इराक किंवा इतर कुठेही अमेरिकेचे जवान तैनात असतील, त्यांच्या सुरक्षेसाठी अमेरिका विशेष अधिकारांचा वापर करील’, असे रायडर पुढे म्हणाले. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी देखील सौदीला असलेल्या धोक्याबाबत चिंता व्यक्त केली. पण अमेरिकेचे पेंटॅगॉन किंवा परराष्ट्र विभागाने कुठेही सौदीच्या सुरक्षेसाठी अमेरिका धावून जाईल, अशी प्रतिक्रिया दिलेली नाही, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून बायडेन प्रशासन आणि सौदी अरेबियामध्ये तणाव निर्माण झाला आहे. महिन्याभरापूर्वी ओपेक प्लसच्या बैठकीत इंधनाच्या उत्पादनात मोठी कपात करण्याचा निर्णय झाला. बायडेन प्रशासनाने यासाठी सौदीला जबाबदार धरून इंधन उत्पादन कपातीचा निर्णय मागे घेण्यासाठी सौदीवर दबाव टाकला. आपली मागणी दुर्लक्षित केल्यास त्याची जबर किंमत चुकवावी लागेल, असा इशारा बायडेन प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिला होता. त्याचबरोबर सौदीला पुरविण्यात येणारी पॅट्रियॉट क्षेपणास्त्रे काढून घेण्याच्या अमेरिकन सिनेटर्सच्या मागणीवर गांभीर्याने विचार सुरू असल्याचे संकेतही दिले होते.
अमेरिकेने सौदीतील पॅट्रियॉट यंत्रणा मागे घेतली तर येमेनमधील इराणसंलग्न हौथी बंडखोर सौदीवर ड्रोन्स व क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवतील, असा इशारा पेंटॅगॉनमधील काही अधिकाऱ्यांनी दिला होता. असे झाले तर सौदीबरोबर येथील अमेरिकी जवानांची सुरक्षा देखील धोक्यात येईल, याकडे या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते. त्यावर सौदी व आखाती क्षेत्रात तैनात असलेल्या अमेरिकी जवानांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ते निर्णय घेऊ, असे पेंटॅगॉनने अधिकृत पातळीवर म्हटले आहे. याद्वारे सौदीच्या सुरक्षेसाठी अमेरिका बांधिल नाही, हा इशारा अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेले पेंटॅगॉन देत आहे.
दरम्यान, सौदीवरील हल्ल्याबाबत पेंटॅगॉन आणि अमेरिकेचे परराष्ट्र विभाग प्रतिक्रिया देत असले तरी सौदी किंवा आखातातील अमेरिकेच्या दूतावासांना कुठल्याही प्रकारचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. तसेच सौदी व आखातातील अमेरिकेच्या नागरिकांसाठी सुरक्षाविषयक सूचना देण्यात आलेल्या नाही, या विसंगतीकडे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्ष वेधत आहेत. यामुळे बायडेन प्रशासन सौदीला आपली मागणी धुडकावल्याच्या परिणामांची जाणीव करून देत असल्याचे संकेत मिळत आहेत.