व्हिएन्ना/तेहरान/मॉस्को – इराणने संवर्धित युरेनियम आयसोटोपच्या मिश्रणाद्वारे ‘युरेनियम मेटल’ची निर्मिती करून अणुकराराच्या आणखी एका नियमाचे उल्लंघन केले. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने ही माहिती उघड केली. युरेनियम मेटलची निर्मिती म्हणजे इराणने अण्वस्त्रनिर्मितीच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याचा दावा रशियन माध्यमे करीत आहेत. तर रशियाने देखील इराणला यावरून समज दिली. आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर इराण अण्वस्त्रनिर्मिती करील, अशी धमकी इराणच्या गुप्तचर विभागाच्या मंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, इराणने ३.६ ग्रॅम वजनाच्या युरेनियम मेटलची यशस्वीरित्या निर्मिती केली आहे. युरेनियम मेटल हे कमी संवर्धित युरेनियम आयसोटोपच्या मिश्रणापासून तयार होते. इस्फाहान येथील प्रकल्पात इराणने युरेनियम मेटलवर काम पूर्ण केल्याचे आयोगाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी ८ फेब्रुवारी रोजी इराणच्या अणुप्रकल्पातील या घडामोडींची माहिती अणुकरारात सहभागी असलेल्या देशांना कळविली होती. पण अद्याप रशिया वगळता सुरक्षा परिषदेतील कुठल्याही देशाने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री सर्जेई रिब्कोव्ह यांनी अणुऊर्जा आयोगाने इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत दिलेल्या माहितीवर तीव्र चिंता व्यक्त केली. ‘इराणने आपल्या अणुप्रकल्पात केलेल्या बदलांमागील कारण रशिया समजू शकतो. पण तसे न करता इराणने संयम दाखवावा व जबाबदारीने निर्णय घ्यावे, असे आवाहन रिब्कोव्ह यांनी केले आहे. रशियन माध्यमांनी देखील इराणने युरेनियम मेटलची निर्मिती करून अण्वस्त्रनिर्मितीसाठी प्रयत्न सुरू केल्याचा ठपका ठेवला. युरेनियम मेटलचा वापर अणुप्रकल्पांमध्ये ऊर्जानिर्मितीसाठी केला जातो. पण त्याचबरोबर अण्वस्त्रनिर्मितीसाठी देखील या युरेनियम मेटलचा वापर होऊ शकतो, असा दावा रशियन माध्यमे करीत आहेत.
अणुऊर्जा आयोगाने केलेल्या या घोषणेवर इराणने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण काही दिवसांपूर्वी इराणच्या गुप्तचर विभागाचे मंत्री महमूद अलावी यांनी अमेरिकेला धमकावले होते. अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इराणवरील निर्बंध मागे घेतले नाहीत आणि आंतरराष्ट्रीय दबाव वाढविण्याचा प्रयत्न केलाच तर इराण देखील स्वत:वर घातलेल्या मर्यादा काढून घेईल आणि इराण अण्वस्त्रनिर्मिती करील. याला इराण नाही तर निर्बंध लादणारे देश जबाबदार असतील, अशी धमकी अलावी यांनी दिली. त्यामुळे इराण उघडपणे अण्वस्त्रसज्जतेची धमकी देत असल्याचे दिसत आहे.
इराणबरोबर अणुकरार करायचा असेल तर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने पहिले पाऊल उचलावे. अमेरिका बिनशर्त अणुकरारात सहभागी होत नाही, तोपर्यंत अणुप्रकल्प सुरू राहिल, अशा धमक्या गेल्या काही दिवसांपासून इराण देत आहे. यासाठी इराणने बायडेन प्रशासनाला २० फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर इराणचा अणुकार्यक्रम रोखणे अवघड ठरेल, असे इराणने बजावले आहे. वारंवार धमक्या देऊन इराण बायडेन प्रशानावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जाते. बायडेन प्रशासनाने देखील पर्शियन आखातातील विमानवाहू युद्धनौका ‘युएसएस निमित्झ’ माघारी बोलावून इराणबरोबर अणुकराराची तयारी केल्याचे बोलले जाते. अशावेळी अणुऊर्जा आयोगाने युरेनियम मेटलबाबत प्रसिद्ध केलेली माहिती बायडेन यांच्या प्रशासनाला अडचणीत टाकणारी ठरत आहे.