तेल अविव – इस्रायलचे धोरण अतिशय स्पष्ट आणि सातत्यपूर्ण आहे. जो कुणीही इस्रायलचे नुकसान करील, त्याला नक्कीच दणका मिळेल. कुठल्याही परिस्थितीत इस्रायल इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही. त्याचबरोबर इस्रायलवर हल्ले चढविण्यासाठी सिरिया व लेबेनॉनमध्ये लष्करी तळ उभारणार्या इराणच्या या ठिकाणांवर इस्रायलचे हल्ले सुरूच राहतील. या भूमिकेपासून इस्रायल कधीच माघार घेणार नाही’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला.
इस्रायली हवाईदलाच्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी सिरियातील इराणच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू राहणार असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून इराण व सिरियाकडून इस्रायलवर हल्ले चढविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. इस्रायलने या धमक्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. तरीही इराणच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्यापासून इस्रायल मागे हटणार नसल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी घोषित केले. त्याचबरोबर इराणच्या अणुकार्यक्रमाचा मुद्दाही नेत्यान्याहू यांनी उपस्थित केला.
अणुबॉम्बच्या निर्मितीपासून इराणला रोखणे हे इस्रायलचे उद्दिष्ट आहे व इस्रायल यशस्वी होईलच, असा विश्वास इस्रायलच्या पंतप्रधानांनी व्यक्त केला. काही तासांपूर्वीच इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांनी इराणवर लष्करी कारवाईची संपूर्ण तयारी झाल्याचे जाहीर केले होते.