न्यूयॉर्क/अबू धाबी – ‘गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अमिरातीच्या तीन बेटांचा ताबा घेणाऱ्या इराणने यावरील नियंत्रण सोडावे. ऐतिहासिकदृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे या तीनही बेटांवर युएईचा सार्वभौम अधिकार आहे. त्यामुळे इराणने ही बेटे युएईच्या हवाली करावीत’, अशी मागणी युएईने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये केली. युएईच्या आवाहनानंतरही इराण या बेटांचा वाद चर्चेने सोडविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याची तक्रार युएईने केली.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत बोलताना, युएईच्या परराष्ट्र मंत्रालयातील आंतरराष्ट्रीय सहकार्य विभागाच्या उपमंत्री रिम बिंत इब्राहिम अल हाशेमी यांनी पर्शियन आखातातील ‘ग्रेटर तंब’, ‘लेसर तंब’ आणि ‘अबू मुसा’ या बेटांचा उल्लेख केला. 1971 सालापर्यंत या तीनही बेटांवर युएईचा कायदेशीर अधिकार होता, याची आठवण हाशेमी यांनी करून दिली.
28 नोव्हेंबर 1971 साली युएई ब्रिटिश वसाहतवाद्यांपासून स्वतंत्र झाला. पुढच्या दोन दिवसात 30 नोव्हेंबर रोजी ब्रिटिश वसाहतवादांनी या तीनही बेटांवरुन माघार घेतली. त्यामुळे या बेटांवर युएईचा कायदेशीर अधिकार मानला जातो. ऐतिहासिक दस्तावेज देखील तीनही बेटे आपल्या संस्कृतीशी जोडलेली असल्याचा दावा युएई करीत आहे.
त्यामुळे या तीनही बेटांवर युएईचा सार्वभौम अधिकार असल्याचे हाशेमी म्हणाल्या. थेट वाटाघाटी किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या माध्यमातून या बेटांवरील आपला दावा सिद्ध करण्यासाठी युएई अजिबात माघार घेणार नसल्याचे हाशेमी यांनी राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात सांगितले. यासाठी शांततेने वाटाघाटी सुरू कराव्या, म्हणून युएई गेली पाच दशके प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे. पण इराणकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे हाशेमी यांनी निदर्शनास आणून दिले.
त्याचबरोबर राष्ट्रसंघाच्या भाषणात हाशेमी यांनी येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएई आणि सौदीवर चढविलेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. काही महिन्यांपूर्वी हौथी बंडखोरांनी युएई व सौदीच्या राजधानी तसेच इंधन प्रकल्पांवर चढविलेल्या हल्ल्यांमुळे या क्षेत्रातील सुरक्षा धोक्यात आली होती, याकडे हाशेमी यांनी लक्ष वेधले. इतर दहशतवादी संघटनांप्रमाणे हौथींच्या या दहशतवादाविरोधातही आवाज उठविण्याची गरज असून इतर देशांनीही यामध्ये भेदभाव करू नये, असे सांगून हाशेमी यांनी हौथींना समर्थन देणाऱ्या इराणवर निशाणा साधला.