तेहरान – ‘‘अरब देशांच्या भूभागाचा वापर करून इस्रायलने इराणला लक्ष्य केले तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सची ‘अदृश्य क्षेपणास्त्रे’ या अरब देशांवर धडकतील’’, अशी धमकी इराणने दिली. गेल्या रविवारी इराकच्या कुर्दिस्तान प्रांतातील इस्रायलच्या छुप्या तळावर चढविलेला हल्ला हा इराकसह इतर अरब देशांसाठी इशारा असल्याचे इराण बजावत आहे. दरम्यान, इराणकडे थेट इस्रायलवर हल्ला चढविण्याची क्षमता असलेली तीन हजार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. अमेरिकेच्या सेंटकॉमचे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी दोन दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती.
गेल्या रविवारी पहाटे इराकच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी इरबिलवर किमान १२ क्षेपणास्त्रे कोसळली. येथील अमेरिकेचे उच्चायुक्तालय व आसपासच्या परिसरात या क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले. या हल्ल्यांमध्ये जीवितहानी झाली नाही, पण उच्चायुक्तालयाचे कंपाऊंड तसेच काही इमारतींचे जबर नुकसान झाले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी वेबसाईटवरुन या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच इरबिलमधील इस्रायलच्या छुप्या तळावर हे हल्ले चढविल्याचे जाहीर केले.
इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ सिरियातील इराणसंलग्न गटांच्या ठिकाणांवर हल्ले चढविण्यासाठी या तळाचा वापर करत असल्याचा आरोप ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने केला. इराणच्या केमरानशहा भागात झालेल्या ड्रोन हल्ल्यातही इराकमधील तळाचाच वापर झाल्याचा दावा इराणचे नेते व लष्करी अधिकारी करीत आहेत. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल रामेझान शरीफ यांनी याप्रकरणी इराकच्या कुर्दिस्तान प्रांताला धमकावले.
‘इराणच्या सुरक्षेला आव्हान देणार्या इस्रायलने इराकमध्ये पुन्हा तळ ठोकला आणि त्यावर इराकी अधिकार्यांनी कारवाई केली नाही, तर ही इराणसाठी रेड लाईन असेल. अशी ठिकाणे नष्ट करणे हा इराणचा अधिकार असून इराण असे करताना अजिबात कचरणार नाही’, असा इशारा ब्रिगेडिअर जनरल शरीफ यांनी दिला.
तर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे कमांडर मोहम्मद तेहरानी मोघादम यांनी याप्रकरणी अरब देशांनाच धमकावले. ‘अरब देशांनी आपल्या भूभागात इस्रायलला तळ उभारू देऊ नये. असे झाले तर अरब देशांमधील या ठिकाणांवर रिव्होल्युशनरी गार्ड्सची क्षेपणास्त्रे कोसळतील’, असे मोघादम यांनी बजावले. त्याचबरोबर इराकमध्ये तैनात अमेरिकेच्या लष्कराला देखील माघार घेण्याची धमकी दिली. काही दिवसांपूर्वी इस्रायलने सिरियात चढविलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे दोन कमांडर ठार झाले होते. यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने इराकमधील इस्रायलच्या तळाला लक्ष्य केल्याचे रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटले होते. पण गेल्या महिन्यात इस्रायलने इराणच्या मुख्य ड्रोननिर्मिती केंद्रावर हल्ले चढविले होते. त्यामुळे खवळलेल्या इराणने इराकमध्ये हल्ले चढविल्याचा दावा इस्रायलमधील लष्करी विश्लेषक करीत आहेत.
दरम्यान, इराकच्या इरबिलमध्ये इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादचा छुपा तळ असल्याचा आरोप याआधीही इराणने केला होता. इस्रायलने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण या हल्ल्यानंतर इस्रायल आणि इराणमधील छुपा संघर्ष आता उघडपणे जगासमोर आल्याचा दावा अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला आहे.