तेहरान – अमेरिका व इराणमध्ये अणुकरारासंदर्भात बातम्या प्रसिद्ध होत असतानाच, इराणने रशियाकडून सुखोई लढाऊ विमाने खरेदी करण्याची घोषणा करून टाकली. यामुळे इराणशी अणुकरार करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अमेरिकेच्या बायडेन प्रशासनासमोरील अडचणींमध्ये अधिकच भर पडल्याचे दिसत आहे. रशियाकडून इजिप्तला सुखोई-35 विमाने पुरविली जाणार होती. पण अमेरिकेने निर्बंधांची धमकी दिल्यानंतर इजिप्तने या व्यवहारातून माघार घेतली. पण इजिप्तची जागा आता इराण घेत असून रशिया व इराणमधील हा व्यवहार बायडेन प्रशासनासाठी फार मोठी डोकेदुखीची बाब ठरू शकते.
इराणच्या हवाईदलाचे वरिष्ठ अधिकारी ब्रिगेडिअर जनरल हमिद वाहेदी यांनी स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना इराण रशियाकडून ‘फोर प्लस प्लस’ श्रेणीतील ‘सुखोई-35’ विमानांची खरेदी करणार असल्याची माहिती दिली. इराणच्या हवाईदलाला सध्या 64 विमानांची आवश्यकता आहे. यापैकी 24 विमाने इजिप्त पुरविणार होते. पण अमेरिकेच्या दबावानंतर इजिप्तने इराणला सदर विमाने पुरविण्याचे टाळले होते. त्यामुळे इराणने भरवशाचा मित्रदेश रशियाकडून आपली हवाईदलाची गरज पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे ब्रिगेडिअर जनरल वाहेदी यांनी सांगितले.
रशिया देखील इराणला तातडीने या लढाऊ विमानांचा पुरवठा करू शकतो. रशिया आणि इजिप्तमध्ये ‘सुखोई-35’ विमानांच्या खरेदीसंबंधी चर्चा झाली होती. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला रशिया इजिप्तला 15 विमाने पुरविणार होता. पण अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इजिप्तला ‘काऊंटरिंग अमेरिकाज् ॲडव्हर्सरिज थ्रू सँक्शन्स ॲक्ट-सीएएटीएसए-कॅट्सा’च्या निर्बंधांची धमकी दिल्यानंतर इजिप्तने रशियाबरोबरच्या या सहकार्यातून माघार घेतली होती. त्यामुळे रशिया इराणला सदर विमानांचा पुरवठा करू शकतो, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. याशिवाय इराण रशियाकडून एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेचे खरेदी करील, असा दावा हे विश्लेषक करीत आहेत.
रशिया व इराणमधील हा व्यवहार अमेरिकेसह इस्रायलला आव्हान देणारा आहे. युक्रेनमधील युद्धावरुन इस्रायल आणि रशियामधील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यावरुनही रशिया वारंवार इशारे देत आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून इस्रायल सिरियावरील हवाई हल्ले चढवित आहे. अशा परिस्थितीत, रशियाने इराणला अतिप्रगत लढाऊ विमानांनी सज्ज करणे इस्रायलसाठी आव्हानात्मक बाब ठरू शकते.