तेहरान – इराणमधील राजवटीच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांची इराणने धरपकड सुरू केली आहे. इराणमधील कुर्दांच्या वस्त्यांवर रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या जवानांनी कारवाई केल्याच्या बातम्या येत आहेत. तर या कारवाईत शाळा-कॉलेजमधील विद्यार्थीनींचा बळी गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या असून युरोपिय महासंघाने यावर संताप व्यक्त केला. तसेच निदर्शकांवर कारवाई करणाऱ्या इराणवर निर्बंध लादण्याची घोषणा केली. पण महासंघाने इराणवर निर्बंध लादले तर त्याचे गंभीर परिणाम होतील, याने इराण व महासंघातील संबंध बिघडतील, असा इशारा इराणने दिला आहे.
22 वर्षीय माहसा अमिनी आणि त्यानंतर निदर्शकांवर जीवघेणी कारवाई करून इराणने मानवाधिकारांचे उल्लंघन केल्याचा आरोप युरोपिय महासंघाने केला आहे. इराणी सुरक्षा यंत्रणेच्या कारवाईत किमान 200 जणांचा बळी गेला तर हजारो जणांना अटक झाल्याचे महासंघ लक्षात आणून देत आहेत. गेल्याच आठवड्यात जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या निघृण कारवाईसाठी जबाबदार असणाऱ्या इराणी नेत्यांना युरोपात प्रवेशबंदी करावी, असे सुचविले होते. तर महासंघाच्या परराष्ट्र धोरणाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी निदर्शकांवर कारवाई करणाऱ्या इराणला फटकारले होते.
यानंतर गुरुवारी युरोपिय महासंघाने मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा आरोप करून इराणवर कठोर निर्बंध लादण्याचे जाहीर केले. येत्या सोमवारी लक्झम्बर्ग येथे होणाऱ्या महासंघाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होईल. पण त्याआधी इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने युरोपिय महासंघाला उद्देशून धमकी दिली. महासंघाकडून इराणवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न झालाच तर त्याचे गंभीर परिणाम इराण व युरोपिय महासंघातील संबंध बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरतील, असा इशारा इराणने दिला.
इराण आणि युरोपिय महासंघातील संबंध आधीच अतिशय नाजूक स्थितीत पोहोचल्याचा दावा इराण करीत आहे. युरोपला सध्या इराणवर टीका करण्याची सवय जडल्याचे ताशेरे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओढले. तर अमेरिकेतील युद्धखोर नेते व गट इराणमध्ये हिंसाचार भडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा ठपका इराणने ठेवला आहे.