वॉशिंग्टन – अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. कासेम सुलेमानी या आपल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण अमेरिकी नेत्यांना लक्ष्य करू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आखाताच्या दौऱ्यावर रवाना होण्याआधी वृत्तसंस्थेने ही माहिती प्रसिद्ध केली.
2020 साली तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेने इराकच्या बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ड्रोन हल्ला चढविला होता. विमानतळातून बाहेर पडणाऱ्या मोटारींच्या ताफ्यावर झालेल्या या हल्ल्यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी व त्यांचे साथीदार ठार झाले होते. यानंतर संतापलेल्या इराणने सुलेमानी यांच्या हत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांची हत्या घडविण्याची धमकी दिली होती. पुढच्या काळात इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले चढविले होते.
तर वर्षभरापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबर अणुकराराबाबत वाटाघाटी सुरू केल्या. यामुळे सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्याचा प्रकार मागे पडल्याचा दावा केला जात होता. पण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेला अहवाल वेगळेच इशारे देत आहे. इराणने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ, सेंटकॉमचे माजी प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांची हत्या घडविण्याची योजना आखल्याचे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण वेगवेगळ्या कारवाया करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अमेरिकेच्या हितसंबंधांना नुकसान पोहोचविण्याचा समावेश आहे. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तयार केलेला हा अहवाल चार दिवसांपूर्वी एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला. अमेरिकी यंत्रणांनी यावर खुलासा केलेला नाही. पण राष्ट्राध्यक्ष बायडेन आखाती देशांच्या दौऱ्यावर निघण्याआधी ही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबरचा अणुकरार पुनर्जिवित करण्याच्या प्रयत्नात आहेत. यासाठी माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर लादलेले निर्बंध मागे घेण्याची तयारीही बायडेन प्रशासनाने केली आहे. पण राष्ट्राध्यक्षांच्या या निर्णयावर अमेरिकेतूनच विरोध वाढत आहे. अशा परिस्थितीत, इराणकडून अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेला धोका असल्याची बातमी बायडेन प्रशासनावरील दडपण वाढविणारी ठरू शकते.