लंडन – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू लवकरच इराणवर हल्ला चढवतील. त्यानंतर इस्रायलच्या या हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी इराण जगभरातील ज्यूधर्मिय नेत्यांना लक्ष्य करील, असा दावा फ्रेंच महिला पत्रकार कॅथरिन पेरेझ-शाकदम यांनी केला. यासाठी इराणच्या रिव्होल्युशरी गार्ड्सने जगभरातील प्रभावशाली ज्यूधर्मियांची यादी तयार करून ठेवलेली आहे, अशी माहिती कॅथरिन पेरेझ-शाकदम यांनी दिली. दरम्यान, इराणने ब्रिटनमध्ये असलेल्या आपल्या शत्रूंवर हल्ल्याचा कट आखला होता, अशी माहिती ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय५’ने गेल्या वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यात दिली होती.
हेन्री जॅक्सन सोसायटी या अभ्यासगटातील आखातविषयक विश्लेषिका, इराणच्या राजवटीशी संलग्न असलेली संकेतस्थळे आणि रशियन वृत्तवाहिनीसाठी वृत्तांकन करणाऱ्या कॅथरिन पेरेझ-शाकदम यांनी इस्रायली वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्ससाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करणारे चित्रपट निर्माते नादिर तालेबझादेह यांनी एका कार्यक्रमात पेरेझ-शाकदम यांना सोबत नेले होते. या कार्यक्रमात तालेबझादेह यांनी इराणने ज्यूधर्मियांविरोधात आखलेल्या कटाची माहिती पेरेझ-शाकदम यांच्यासमोर बोलून दाखविली.
इराणच्या राजकारणावर नियंत्रण असलेले सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांना इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याची चिंता सतावित आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू इराणवर हल्ला चढविल्यावाचून राहणार नाहीत. इराणच्या तुलनेत इस्रायलकडे अधिक लष्करी सामर्थ्य आहे, हे देखील खामेनी यांना मान्य आहे. असे असले तरी इस्रालने इराणवर हल्ला चढविण्याची चूक केलीच तर इराणने देखील त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे, अशी माहिती तालेबझादेह यांनी आपल्याला दिल्याचे पेरेझ-शाकदम यांनी सांगितले. जगभरातील ज्यूधर्मिय नेते, व्यापारी, व्यावसायिक, स्वयंसेवी संघटनांमधील अधिकाऱ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबियांची यादी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने तयार केली आहे. इस्रायलने इराणवर हल्ला चढविलाच तर जगभरातील या ज्यूधर्मियांना लक्ष्य करण्याची योजना खामेनी यांनी आखली आहे. समाजावर प्रभाव असणारे तसेच प्रचारक ज्यूधर्मियांची घरे देखील रिव्होल्युशनरी गार्ड्सने पाहून ठेवली आहेत, असे पेरेझ-शाकदम म्हणाल्या. मी देखील ज्यूधर्मिय आहे, हे तालेबझादेह यांना माहिती देताना ठाऊक नव्हते, असा दावा पेरेझ-शाकदम यांनी केला.
पेरेझ-शाकदम ह्या इराणमधील पत्रकारितेसाठी प्रसिद्ध आहेत. इराणच्या राजवटीने पाश्चिमात्य माध्यमांवर बंदी टाकलेली असली तरी इराणच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्या देशाची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी काही युरोपिय पत्रकारांना मुलाखती दिल्या आहेत. पेरेझ-शाकदम यांनी इराणचे सर्वोच्च नेते खामेनी तसेच राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. रशियन वृत्तवाहिनीद्वारे जगभरात इराणच्या बातम्या पोहोचविणाऱ्यांमध्ये पेरेझ-शाकदम आघाडीवर आहेत. त्यामुळे पेरेझ-शाकदम यांनी ज्यूधर्मियांबाबत दिलेल्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले जाते.
गेल्य वर्षी नोव्हेंबर महिन्यात ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय५’चे संचालक केन मॅक्कलम यांनी इराणचा मोठा कट उधळल्याची घोषणा केली होती. ब्रिटीश नागरिक किंवा ब्रिटनमध्ये असलेल्या आपल्या शत्रूंवर हल्ले चढविण्याची योजना इराणने आखली होती. पण याची माहिती मिळाल्यानंतर ब्रिटनने इराणचे असे १० हल्ले उधळले होते, असे मॅक्कलम म्हणाले.