सिस्तान-बलोचिस्तानच्या सीमेवर इराणच्या लष्कराची तालिबानशी चकमक

सिस्तानतेहरान/काबुल – इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जवान आणि अफगाणिस्तानातील तालिबानच्या दहशतवाद्यांमध्ये बुधवारी चकमक झाली. सिस्तान-बलोचिस्तानच्या सीमेवर झालेल्या या चकमकीत तालिबानचे दहशतवादी मारले गेल्याच्या तसेच तालिबानने इराणच्या लष्करी चौक्या ताब्यात घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याला दुजोरा मिळालेला नाही. पण ही चकमक गैरसमजातून झाल्याचे इराणने जाहीर केले आहे.

अफगाणिस्तानच्या निमरूझ प्रांतातील कांग जिल्ह्याच्या सीमेवर ही चकमक झाली. इराणच्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांतातील शघालकच्या सीमेजवळ इराणने सुरक्षाभिंत उभारली आहे. इराणच्या हद्दीत ही भिंत असून याच्या पलिकडेही इराणची हद्द आहे. अफगाणिस्तानातून होणारी तस्करी रोखण्यासाठी इराणच्या सुरक्षा यंत्रणांनी ही भिंत उभारली होती. बुधवारी स्थानिक इराणी शेतकरी या भिंतीच्या पलिकडे गेल्यानंतर सीमेपलिकडील तालिबानच्या दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला.

सिस्तानहे शेतकरी इराणच्याच हद्दीत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रत्युत्तरादाखल इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने त्वरित या गोळीबाराला उत्तर दिले. इराणच्या जवानांनी तालिबानी दहशतवाद्यांवर तोफांचे हल्ले चढविले. काही काळानंतर हा गोळीबार थांबला. गैरसमजामुळे सीमेवर संघर्ष भडकल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी संध्याकाळी जाहीर केले. पण इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने तालिबानचा उल्लेख करण्याचे टाळले.

तालिबानने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. पण स्थानिक तालिबानी दहशतवाद्यांनी या संघर्षाचे व्हिडिओ प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये तालिबानचे दहशतवादी इराणच्या हद्दीत घुसल्याचे आणि इराणी सुरक्षा चौक्यांचा ताबा घेतल्याचे दाखविण्यात आले होते. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सशी जोडलेल्या वृत्तसंस्थेने या व्हिडिओमधील दावा फेटाळला. तसेच सिस्तान-बलोचिस्तानच्या सीमेवर शांतता असल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केला. तर सिस्तान-बलोचिस्तान सीमेची जबाबदारी असलेल्या इराणच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सीमेवरील या तणावासाठी तालिबानचे दहशतवादी जबाबदार असल्याचा ठपका ठेवला.

इराण आणि अफगाणिस्तान दोन्ही शेजारी देश असून इराणच्या सिस्तान-बलोचिस्तान प्रांताची मोठी सीमारेषा अफगाणिस्तानला भिडलेली आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेतून मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचा आरोप इराण करीत आहे. ही तस्करी रोखण्यासाठी इराणने काही वर्षांपूर्वी सुरक्षाभिंत उभारली होती. यावरून पाकिस्तान आणि इराणच्या लष्करात सीमेवर संघर्ष झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. अफगाणिस्तानमध्ये लोकशाहीवादी सरकार असेपर्यंत या सीमेवर तणाव निर्माण झाला नव्हता. पण अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पहिल्यांदाच चकमक झाली आहे.

इराणने अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही. तालिबानने अफगाणिस्तानात सर्वसमावेशक सरकार स्थापन करावे आणि त्यात शियापंथियांनाही त्यांचे हक्काचे स्थान द्यावे, अशी इराणची मागणी आहे. तालिबान ही मागणी मान्य करायला तयार नाही. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून इराणने तालिबानबाबत अतिशय सावध भूमिका स्वीकारल्याचे दिसत आहे.

leave a reply