बगदा – रविवारी पहाटे इराकच्या इरबिल शहरात १२ क्षेपणास्त्र हल्ले झाले. येथील अमेरिकेच्या उच्चायुक्तालयाची इमारत व आसपासच्या भागात ही क्षेपणास्त्रे कोसळली. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. इरबिलमधील इस्रायलच्या छुप्या तळाला लक्ष्य केल्याचा दावा रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केला. गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरियामध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात रिव्होल्युशनरी गार्ड्सचे दोन कमांडर्स ठार झाले होते. त्यांचा सूड घेण्यासाठी इराणने हे हल्ले चढविल्याचा दावा केला जातो.
इराकच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी इरबिलवर रविवारी पहाटे क्षेपणास्त्र हल्ले झाले. येथील अमेरिकी उच्चायुक्तालयाच्या नव्या इमारतीच्या दिशेने एकूण १२ क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यामध्ये एक नागरीक गंभीर जखमी झाला असून अमेरिकी उच्चायुक्तालयाच्या कंपाऊंडचे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. तसेच येथील कुर्दिस्तान वृत्तवाहिनीच्या इमारतीचेही जबर नुकसान झाल्याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत.
सुरुवातीला येथील अमेरिकेचे उच्चायुक्तालय आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यासाठी हे हल्ले झाल्याची चर्चा होती. या हल्ल्यांसाठी इराणी बनावटीचे ‘फतेह-१०’ या क्षेपणास्त्रांचा वापर झाल्याचे इराकी यंत्रणांनी म्हटले होते. त्यामुळे यामागे इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना सहभागी असल्याच्या शक्यता वर्तविण्यात येत होत्या.
रविवार दुपारपर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कुठल्याही संघटनेने स्वीकारली नव्हती. पण इराणी वृत्तवाहिनीच्या इराकमधील पत्रकाराने हे क्षेपणास्त्र हल्ले इरबिलमधील इस्रायलच्या छुप्या तळाला लक्ष्य करण्यासाठी झाल्याचे आपल्या वृत्तात म्हटले. त्याबरोबर या हल्ल्यामागे इराणचा सहभाग असल्याचे आरोप तीव्र होऊ लागले.
दुपारनंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने आपल्या संकेतस्थळावर या क्षेपणास्त्र हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. त्याचबरोबर इरबिलमधील इस्रायलचे छुपे तळ यांना लक्ष्य केल्याची घोषणा रिव्होल्युशनरी गार्ड्सनी केली. यापुढे इस्रायलने इराणच्या हितसंबंधांना लक्ष्य केले तर इस्रायलला याहून भीषण प्रत्युत्त मिळेल, असा इशारा रिव्होल्युशनरी गार्ड्सनी दिला.
या हल्ल्यामागील कारण इराणच्या या मुख्य लष्करी गटाने उघड केले नाही. पण गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरियात केलेल्या हवाई हल्ल्यांवर रिव्होल्युशनरी गार्ड्सची ही प्रतिक्रिया आल्याचा दावा केला जातो. आठवड्यापूर्वी इस्रायलने सिरियाची राजधानी दमास्कस येथे चढविलेल्या हवाई हल्ल्यात रिव्होल्युशनरी गार्ड्सचे दोन कमांडर ठार झाले होते. यानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्सनी इस्रायलला सूड घेण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, इराण आणि पश्चिमात्य देशांमध्ये व्हिएन्ना येथे अणुकराराबाबत सुरू असलेल्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. अशावेळी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनी इराकमध्ये चढविलेले क्षेपणास्त्र हल्ले लक्षवेधी ठरतात.