तेहरान – ‘सौदी अरेबिया आणि शेजारी देशांबाबत इराणने आत्तापर्यंत धोरणात्मक संयमी भूमिका स्वीकारली आहे. पण यापुढेही हिंसक निदर्शनांना हवा देऊन इराणला अस्थिर करणे सुरू ठेवले तर सौदीबाबतचा संयम आणखी किती काळ टिकेल, याची हमी इराण देऊ शकत नाही. कारण या कुरापतींना इराणने उत्तर दिले तर संबंधित देशांमधील काचेचे महाल कोसळतील आणि तेथे अस्थैर्य निर्माण होईल’, असा इशारा इराणच्या गुप्तचर विभागाचे मंत्री इस्माईल खतिब यांनी दिला. दरम्यान, इराणमधील हिजाबसक्तीच्या विरोधातील आंदोलन चिघळले असून धार्मिक नेत्यांवर हल्ले वाढल्याच्या बातम्या येत आहेत.
गेल्या आठ आठवड्यांपासून इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या राजवटीविरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनासाठी इराणने अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबिया यांना जबाबदार धरले आहे. एकूण आठ देशांनी इराणमधील आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या तरुणांना प्रशिक्षण दिल्याचा दावा इराण करीत आहे. आपल्या एजंट्सचा वापर करून हे देश दंगली घडवीत असल्याचा ठपका इराणने ठेवला होता. याप्रकरणी इराणने काही परदेशी नागरिकांना अटक केल्याचे इराणने जाहीर केले होते.
अशा परिस्थितीत, इराणच्या गुप्तचर विभागाचे मंत्री इस्माईल खतिब यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत इराणमधील अस्थैर्यासाठी थेट सौदी अरेबियाला जबाबदार धरले. ‘इराण आणि सौदी अरेबिया दोन्ही शेजारी देश आहेत. त्यामुळे दोन्ही देशांचे हितसंबंध परस्परांशी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत, इराणमधील अस्थैर्य सौदीसह या क्षेत्रातील इतर देशांमध्येही पसरेल आणि त्यांच्यासाठी तितकेच घातक ठरेल’, अशा थेट शब्दात खतिब यांनी सौदीला धमकावले.
‘आत्तापर्यंत इराणने कुठलाही फरक न करता सौदीबाबत धोरणात्मक संयमी भूमिका स्वीकारली होती. पण आणखी किती काळ सौदीबाबतची ही भूमिका टिकून राहील, याची हमी इराण देऊ शकत नाही. वेळ आलीच तर इराण संबंधित देशांना योग्य त्या भाषेत उत्तर देईल. असे झाले तर या देशांमधील काचेचे महाल कोसळतील आणि ते देश अस्थैर्यात झोकून दिले जातील’, अशी धमकी खतिब यांनी दिली.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दुसऱ्यांदा इराणने सौदी अरेबियाला धमकावताना काचेच्या महालांचा उल्लेख केला आहे. काचेच्या महालात राहणाऱ्या सौदीच्या नेत्यांनी इस्रायलवर विसंबून राहू नये, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या प्रमुखांनी दिली होती. इराणच्या या दोन्ही धमक्यांकडे सौदीने पूर्णपणे दुर्लक्ष करून प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
दरम्यान, गेल्या काही तासात इराणमधील हिजाबसक्तीच्या विरोधात सुरू असलेली आंदोलने तीव्र झाली आहेत. इराणमधील तरुणी, महिला आक्रमक बनल्या असून त्या रस्त्यावरुन चालणाऱ्या धार्मिक नेत्यांवर हल्ले चढवीत असल्याचे व्हिडिओज् समोर येत आहेत. तर इराणसह आखातात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये इराणी महिला धार्मिक नेत्यांना गाठोडी बांधून देश सोडण्याचा इशारा देत असल्याचे दिसत आहे. इराणच्या चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिका देखील या निदर्शनांच्या बाजूने उतरल्याच्या बातम्या येत आहेत. तर थायलंड येथील वॉटर पोलो स्पर्धेत सहभागी झालेल्या इराणच्या संघाने राष्ट्रगीत नाकारून हिजाबसक्तीच्या विरोधातील आंदोलनाला समर्थन दिल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे.