वॉशिंग्टन – ‘गेल्या काही महिन्यांमध्ये आयएस-खोरासन ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात मोठी झाली आणि या देशाच्या सर्वच प्रांतांमध्ये विस्तारली आहे. गेल्या वर्षभरात आयएस-खोरासनचे अफगाणिस्तानातील हल्ले पाच पटीने वाढले आहेत’, अशी चिंता संयुक्त राष्ट्रसंघातील अफगाणिस्तानविषयक विशेषदूत देबोरा लियॉन्स यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तानातील आयएसच्या या विस्ताराकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने सावधपणे पाहण्याची आवश्यकता असल्याचे लियॉन्स म्हणाल्या.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने अफगाणिस्तानाबाबत विशेष बैठक आयोजित केली आहे. या निमित्ताने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेल्या राष्ट्रसंघाच्या विशेषदूत देबोरा लियॉन्स यांनी या देशातील अस्थैर्याकडे लक्ष वेधले. तालिबान या दहशतवादी संघटनेने काबुलचा ताबा घेतल्यापासून अफगाणिस्तानातील अस्थैर्य वाढत असल्याचा दावा लियॉन्स यांनी केला. इराक-सिरियात कार्यरत असलेल्या ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेशी संलग्न असलेली आयएस-खोरासन ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या अस्थैर्याचे कारण असल्याचे लियॉन्स म्हणाल्या.
आयएस-खोरासन कधीकाळी राजधानी काबुल आणि अफगाणिस्तानातील काही मोजक्या प्रांतांपर्यंत मर्यादित होती. पण गेल्या काही महिन्यांमध्ये या दहशतवादी संघटनेने सर्वच्या सर्व ३४ प्रांतांमध्ये विस्तार केल्याचे आणि धोकादायक प्रमाणात सक्रीय असल्याचे लियॉन्स यांनी सांगितले. गेल्या वर्षी २०२० साली आयएस-खोरासनने अफगाणिस्तानात ६० हल्ले केले होते. पण या वर्षात याच दहशतवादी संघटनेने ३३४ हल्ले चढविल्याचे लियॉन्स यांनी लक्षात आणून दिले.
अफगाणिस्तानचा ताबा घेणारी दहशतवादी संघटना तालिबान या आयएस-खोरासन दहशतवादी संघटनेवर कारवाई करीत असल्याचा दावा करीत आहे. पण तालिबानचे दहशतवादी आयएसच्या दहशतवादी तसेच संशयितांना अटक करून त्यांचे मुडदे पाडत असल्याचा आरोप लियॉन्स यांनी केला. तालिबानची ही कारवाई आणि आयएसचे वाढते हल्ले, अफगाणिस्तानातील या घडामोडींकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने सावधपणे पाहण्याची आवशक्यता असल्याचे आवाहन लियॉन्स यांनी केले.
दरम्यान, तालिबानच्या नियंत्रणाखाली गेलेल्या अफगाणिस्तानच्या भूमीतून यापुढे अल कायदा, आयएससारख्या दहशतवादी संघटना अधिक मजबूत होतील. तसेच या दहशतवादी संघटना येत्या काळात ९/११ पेक्षा भीषण हल्ले अमेरिका व युरोपिय देशांवर चढवतील, असा इशारा अमेरिकेच्या लष्करी अधिकारी व विश्लेषकांनी दिला होता.