अंकारा – तुर्कीच्या सुरक्षा यंत्रणेने सिरियात केलेल्या कारवाईत ‘आयएस’ या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ‘अबू हुसेन अल-कुरेशी’ याला ठार केले. तुर्कीची सिरियातील कारवाई एवढ्यावर थांबणार नसून यापुढेही आयएसच्या दहशतवाद्यांवर तुर्कीचे हल्ले सुरू राहतील, असा इशारा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी दिला. तुर्कीमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. अशावेळी तुर्कीने ही कारवाई केल्याचा आरोप एर्दोगन यांचे राजकीय विरोधक करीत आहेत.
सिरियाच्या उत्तरेकडील आफ्रिन प्रांतातील जिंदीरेस या भागात आयएसचा प्रमुख अल-कुरेशी दडल्याची माहिती तुर्कीच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्याबरोबर तुर्कीच्या हवाईदलाने जिंदीरेस येथे चढविलेल्या हवाई हल्ल्यात अल-कुरेशी ठार झाल्याचे एर्दोगन यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. शनिवारी केलेल्या या कारवाईत आणखी काही जीवितहानी झाली का, याचे तपशील तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले नाही. तसेच ‘आयएस’ने देखील यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.
पण तुर्कीचे लष्कर व ‘अहरार अल-शारकीया’ या दहशतवादी संघटनेने आपल्याच ताब्यातील भागात ‘आयएस’वर ही कारवाई केली, याकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषक लक्ष वेधत आहेत. सिरियाच्या उत्तरेकडील भागावर तुर्कीचे लष्कर व संलग्न दहशतवादी संघटनांचे वर्चस्व असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे तुर्कीने आपल्याच नियंत्रणातील भागात ही कारवाई केली. आयएसने तुर्कीच्या या दाव्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हिंदी