अफगाणिस्तानातील चीनच्या गेस्ट हाऊसवर ‘आयएस’चा दहशतवादी हल्ला

तीन ठार, 21 जखमी

kabul blastकाबुल – ‘इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रोव्हिन्स-आयएसकेपी’ने अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये दहशतवादी हल्ला चढविला. चीनच्या अधिकाऱ्यांची वर्दळ असलेल्या गेस्ट हाऊसवर झालेल्या या हल्ल्यात तीन ठार ते 21 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चिनी नागरिकांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. गेल्याच आठवड्यात काबुलमधील पाकिस्तानच्या दूतावासाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. दरम्यान, आत्तापर्यंत अफगाणिस्तानातील तालिबान व अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणाऱ्या ‘आयएस’ने थेट चीनच्या नागरिकांना लक्ष्य करून वेगळाच इशारा दिला आहे.

काबुलच्या ‘शहर-ए-नाव’ या व्यावसायिक क्षेत्रातील ‘काबुल लोंगान हॉटेल’ ही बहुमजली इमारत चीनचे गेस्ट हाऊस म्हणून प्रसिद्ध आहे. चीनचे राजनैतिक अधिकारी व व्यापारविषयक चर्चेसाठी अफगाणिस्तानात दाखल होणारे चिनी उद्योजक याच गेस्ट हाऊसमध्ये थांबतात. तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर गेल्या वर्षभरात चिनी अधिकाऱ्यांच्या या गेस्ट हाऊसमधील भेटीगाठी वाढल्या होत्या, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

मात्र, चोवीस तासांपूर्वी काबुलमधील चीनच्या दूतावासातील राजनैतिक अधिकाऱ्यांनी तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. तालिबानने अफगाणिस्तानातील चिनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी चीनने केल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर चिनी अधिकारी व तालिबानमधील भेटीचा फोटोग्राफ समोर आला होता. पण तालिबानने चीनला कोणते आश्वासन दिले, याचे तपशील समोर आलेले नाहीत. चीनने देखील या भेटीला प्रसिद्धी देण्याचे टाळले होते.

अशा परिस्थितीत, सोमवारी ‘काबुल लोंगान हॉटेल’मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. चिनी अधिकारी व नागरिक हॉटेलमध्ये असताना दहशतवाद्यांनी मुख्यप्रवेशद्वाराजवळ येताच मोठा स्फोट घडविला. त्यानंतर या दहशतवाद्यांनी हॉटेलमधील मजल्यांवर दडून बसलेल्या परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली होती. 2008 साली मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती काबुलमध्ये होत असल्याचे दावे काही माध्यमांनी केले होते.

Fire at hotel in Shahr-e-Naw, Kabulत्यानंतर या गेस्ट हाऊसमधील हल्ल्यात सात चिनी नागरिक तर अकरा तालिबानी ठार झाल्याची चर्चा सुरू झाली होती. पण तालिबानचा प्रवक्ता मुजाहिद याने अफगाणी माध्यमांना दिलेल्या माहितीत, काबुल लोंगान हॉटेलमध्ये हल्ला चढविणारे आयएसचे तीनही दहशतवादी ठार झाल्याचे सांगितले. तसेच या हल्ल्यात 21 जण जखमी झाल्याची माहिती मुजाहिदने दिली. तर जखमींमध्ये दोन चिनी नागरिकांचा समावेश असल्याचा दावा जखमींवर उपचार करणाऱ्या जवळच्या रुग्णालयाने केला. तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता प्रस्थापित केल्यापासून आयएसच्या दहशतवाद्यांचे येथील हल्ले वाढले आहेत. अफगाणिस्तानातील हजारा अल्पसंख्यांक तसेच तालिबानच्या नेत्यांवर आयएसने हल्ले चढविले आहेत. तालिबानच्या अंतर्गत सुरक्षा मुख्यालयालाही आयएसने लक्ष्य केले होते. पण गेल्या आठवड्यात आयएसच्या दहशतवाद्यांनी काबुलमधील पाकिस्तानच्या दूतावासावर हल्ला चढविला. पाकिस्तानचे राजदूत या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते. त्याला सात दिवसही पूर्ण होत नाही तोच आयएसच्या दहशतवाद्यांनी चीनच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केले.

दरम्यान, पाकिस्तानातील चिनी प्रकल्पांवर दहशतवादी हल्ले होत असल्याची तक्रार चीन करीत आहे. या दहशतवादी हल्ल्यांमुळे पाकिस्तानातील ‘चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ रखडला असून चीनचे सरकार पाकिस्तानवर अतिरिक्त सुरक्षा पुरविण्यासाठी दबाव वाढवित आहे. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानातील चीनची गुंतवणूक देखील धोक्यात सापडल्याचे काबुलमधील हल्ल्यातून दिसत आहे.

leave a reply