हमासच्या रॉकेट्स हल्ल्यांनंतर इस्रायल, गाझातील तणाव वाढला

जेरूसलेम – गुरुवारी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर चार किंवा त्याहून अधिक रॉकेट्सचे हल्ले चढविले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले. गेल्या चार दिवसात दुसऱ्यांदा हमास आणि इस्रायलमध्ये संघर्ष भडकला. यामुळे इस्रायलचे लष्कर आणि गाझापट्टीतील हमासचे दहशतवादी यांच्यात नव्याने लष्करी संघर्ष भडकणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच याचे पडसाद जेरूसलेममध्ये देखील उमटू शकतात, असा इशारा इस्रायली यंत्रणा देत आहेत.

दोन दिवसांपूर्वी गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला झाला होता. यानंतर इस्रायलने हवाई हल्ले चढवून हमासचे शस्त्रास्त्रांचे गोदाम नष्ट केले. हमासने देखील पहिल्यांदाच विमानभेदी क्षेपणास्त्राचा वापर करून आपली सज्जता दाखवून दिली होती. पण हा संघर्ष चिघळू नये, यासाठी हमासने इजिप्तकडे धाव घेतल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

पण या घटनेला दोन दिवसही पूर्ण होत नाही तोच, हमासच्या दहशतवाद्यांनी बुधवारी मध्यरात्रीनंतर इस्रायलवर रॉकेट्सचे हल्ले चढविले. तसेच इस्रायली लढाऊ विमानांच्या विरोधात पुन्हा एकदा विमानभेदी क्षेपणास्त्रांचा वापर केला. इस्रायलच्या आयर्न डोम यंत्रणेने हे रॉकेट हल्ले यशस्वीरित्या भेदल्याचे फोटोग्राफ्स व व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत. पण यानिमित्ताने हमास वर्षभरापूर्वीच्या संघर्षाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत असल्याचे इशारे इस्रायलमधील लष्करी विश्‍लेषक देत आहेत.

गेल्या वर्षी याच काळात हमासने इस्रायलवर सलग 15 दिवस रॉकेट्सचा वर्षाव केला होता. यामुळे जगाला हमासच्या शस्त्रसज्जतेची ओळख झाली होती. पण काही दिवसांपूर्वीच हमासने येत्या काळात इस्रायलवर याहून भीषण हल्ले चढविले जातील, अशी धमकी दिली. सलग सहा महिने इस्रायलवर रॉकेट्स व क्षेपणास्त्रांचा वर्षाव होईल, इतकी सज्जता ठेवल्याची धमकी हमासने दिली होती. अशा परिस्थितीत हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यांमध्ये होत असलेली वाढ अतिशय चिंताजनक असल्याचे लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. तर हमास इस्रायलवरील आपले हल्ले वेस्ट बँक आणि जेरूसलेममधील इस्रायली सुरक्षा यंत्रणेच्या कारवाईशी जोडत आहे. इस्रायलमधील गट पॅलेस्टिनींच्या भावना दुखाविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे भयावह परिणाम इस्रायलला भोगावे लागतील, असे हमासने धमकावले होते. इस्रायलची अंतर्गत सुरक्षा यंत्रणा शिन बेतने देखील काही इस्रायली नेत्यांचा नावासह उल्लेख करून इशारा प्रसिद्ध केला.

इस्रायली पोलीस व लष्कराने वेस्ट बँकसह जेरूसलेममधील सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. पण येत्या काळात इस्रायली नेते इतामर बेन ग्विर यांना निर्बंधित ठिकाणी प्रवेश दिला तर नवे गाझा युद्ध भडकेल, असे शिन बेतने बजावले आहे. बेन ग्विर हे इस्रायल-गाझा युद्धात एका स्फोटकाप्रमाणे काम करतील, असे इस्रायली सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे आहे.

leave a reply