इस्रायलने नाटोमध्ये सहभागी व्हावे

- युरोपिय महासंघाच्या सल्लागारांचे इस्रायलला आवाहन

नाटोमध्ये सहभागीब्रुसेल्स – युक्रेनमधील युद्धात रशियन लष्कराची सरशी सुरू असताना युरोपिय महासंघ इस्रायलकडे अतिशय अपेक्षेने पाहत आहे. ‘मजबूत लोकशाही आणि मुल्यांवर आधारीत समाजव्यवस्था तसेच संरक्षण सज्जता असणार्‍या इस्रायलने नाटोमध्ये सामील होण्यावर विचार करायला हवा’, असे आवाहन युरोपिय महासंघाच्या सल्लागारांनी केले. त्याचबरोबर इस्रायलची संरक्षणसज्जता सध्याच्या काळात व भविष्यासाठी नाटोसाठी उपकारक ठरेल, असे महासंघाच्या सल्लागारांनी म्हटले आहे.

इस्रायल हा अमेरिका आणि युरोपचा मित्रदेश असला तरी नाटोचा सदस्य देश नाही. २०१४ साली नाटोने पहिल्यांदा इस्रायलला महत्त्वाचा ‘नॉन नाटो’ सहकारी देश म्हणून घोषित केले होते. तर २०१६ साली नाटोने ब्रुसेल्स येथील आपल्या मुख्यालयात इस्रायलला कार्यालय सुरू करण्याची परवानगी दिली. त्यानंतरच्या वर्षी नाटो व इस्रायलमध्ये संरक्षणविषयक सहकार्यावर करारही झाला. पण इस्रायल या लष्करी संघटनेचा सदस्य बनलेला नाही, ही नाटोसाठी अतिशय चिंताजनक बाब असल्याचे युरोपिय महासंघाच्या सल्लागारांनी म्हटले आहे.

युरोपिय महासंघाचे सल्लागार अलेक्झांड्र क्रॉस आणि नुनो वाह्नॉन-मार्टिन्स यांनी ‘ब्रुसेल्स टाईम्स’साठी लिहिलेल्या लेखात इस्रायलला नाटोत सहभागी होण्याचे आवाहन केले. तर नाटोने देखील इस्रायलला आपल्या संघटनेचा सदस्यदेश करण्यासाठी प्रयत्न करावे, असे या दोघांनी सुचविले. ‘इस्रायली बनावटीच्या संरक्षणसाहित्याचा दर्जा, तंत्रज्ञान आणि इस्रायलची गुप्तचर यंत्रणा नाटोच्या सामर्थ्यात मोठी वाढ करतील’, असा दावा क्रॉस आणि नुनो यांनी केला.

त्याचवेळी इस्रायल सदस्य देश बनल्यास नाटोतील ‘आर्टिकल ५’मुळे आखातात संघर्ष भडकण्याची शक्यता बळावेल, असा इशाराही क्रॉस व नुनो यांनी दिला. नाटोच्या ‘आर्टिकल ५’नुसार सदस्य देशावरील हल्ला हा नाटोवरील हल्ला समजून त्याला उत्तर दिले जाईल. अशा परिस्थितीत, इराण किंवा इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी इस्रायलवर हल्ला चढविलाच तर अमेरिका व युरोपिय देशांना इराण किंवा या गटांवर कारवाई करणे बंधनकारक ठरेल, याकडे क्रॉस व नुनो यांनी लक्ष वेधले.

‘इराण किंवा इराणसंलग्न संघटनांकडून इस्रायलवर हल्ल्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास नाटोला इस्रायलच्या सुरक्षेसाठी लष्करी कारवाई करावी लागेल व यामुळे आखातात दीर्घकालिन संघर्ष भडकेल. हा संघर्ष आखातापलिकडे उत्तर आफ्रिकेतील काही भागातही पसरू शकतो’, असा इशारा युरोपिय महासंघाच्या या सल्लागारांनी दिला. इस्रायलच्या नाटोतील या सदस्यत्वाला तुर्कीकडून विरोध होऊ शकतो. पण त्याआधी इस्रायल नाटोत सहभागी व्हायला तयार आहे का, हे पाहणे महत्त्वाचे ठरते, असे सांगून क्रॉस आणि नुनो यांनी इस्रायलच्या भूमिकेवर सारे काही अवलंबून असल्याचे स्पष्ट केले.

leave a reply