इस्रायलची शेजारी देशांसह ड्रोन्सच्या हल्ल्याविरोधात आघाडी

- इस्रायली वृत्तवाहिनीचा दावा

ड्रोन्सच्या हल्ल्याविरोधातजेरुसलेम – ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी इस्रायल व शेजारी देश ड्रोनविरोधी आघाडी उभारीत आहेत. इस्रायलच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसिद्ध केली. हे शेजारी देश कोण, ते या वृत्तवाहिनीने स्पष्ट केलेले नाही. इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांमुळे इस्रायल व युएई जवळ येत असल्याचा दावा केला जातो. चॅनेल १२ वृत्तवाहिनीने इस्रायल व शेजारी देशांमधील या ड्रोनविरोधी आघाडीची माहिती दिली. सौदी अरेबिया आणि युएई यांच्यावर काही दिवसांपूर्वी ड्रोन्स तसेच क्रूज क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले होते. अरब देशांवर झालेल्या या हल्ल्यामागे येमेन आणि इराकमधील इराणसंलग्न दहशतवादी संघटना असल्याचा आरोप सौदी व युएईने केला होता. त्यानंतर इस्रायलने शेजारी देशांबरोबर ड्रोनविरोधी आघाडी उभारण्यासंबंधी हालचाली सुरू केल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

हे सहकार्य पुढे गेल्यास इस्रायल व शेजारी देश परस्परांना संभाव्य ड्रोन हल्ल्याची माहिती पुरवतील. तसेच आवश्यकता निर्माण झाली तर इस्रायल या देशांना ड्रोन हल्ले भेदण्यासाठी सहाय्य देखील करू शकेल. इस्रायली वृत्तवाहिनीने ही माहिती देताना कुठल्याही सूत्रांचा हवाला दिलेला नाही किंवा या शेजारी देशांची नावे उघड केलेली नाहीत. पण गेल्या काही महिन्यांमधील घडामोडी लक्षात घेता, इस्रायल व अब्राहम करारामध्ये सहभागी झालेल्या अरब देशांमध्ये अशा प्रकारची आघाडी शक्य असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये इस्रायलने युएई, बहारीन व मोरोक्को या अरब देशांना हवाई सुरक्षा यंत्रणा पुरवण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत. याविषयीच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये ठळकपणे समोर आल्या होत्या. तर येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएईची राजधानी अबु धाबीवर झालेल्या ड्रोन्सच्या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी या देशाचा दौरा केला होता.

गेल्या आठवड्यात लेबनॉनमधील इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर ड्रोन हल्ला चढविला होता. त्यानंतरच इस्रायल व अरब देशांमधील या ड्रोनविरोधी आघाडीची बातमी समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या नौदलाने आखाती क्षेत्रामध्ये शंभर ड्रोन्सचा ताफा तैनात करण्याची घोषणा केली आहे. हवाई आणि सागरी सर्वेक्षणासाठी तैनात केले जाणारे हे ड्रोन्स अमेरिकेन नौदलाचे कान आणि डोळे म्हणून काम करतील, असा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला आहे. पर्शियन आखातामधून मोठ्या प्रमाणात इंधन आणि व्यापारी मालाची वाहतूक केली जाते. त्याच्या सुरक्षेसाठी ही तैनाती असल्याचा दावा केला जातो. २०२३ सालापर्यंत ही तैनाती पूर्ण होईल, असे अमेरिकन नौदलाचे म्हणणे आहे.

leave a reply