तेहरान – ‘इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने आयोजित केलेला हा युद्धसराव म्हणजे इस्रायलसाठी गंभीर इशारा ठरतो. येत्या काळात इस्रायलने इराणवर हल्ल्याची चूक केल्यास इस्रायलचे हात छाटून टाकू’, अशी धमकी रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल हुसेन सलामी यांनी दिली. काही तासांपूर्वी इस्रायलचे नवनियुक्त हवाईदलप्रमुख मेजर जनरल टोमर बार यांनी इस्रायलची लढाऊ विमाने इराणवर हल्ल्यासाठी सज्ज असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर इराणकडून ही प्रतिक्रिया आली आहे.
सोमवारपासून इराणच्या दक्षिणेकडील भागात रिव्होल्युशनरी गार्ड्सने वार्षिक लष्करी सराव सुरू केला होता. शुक्रवारी या सरावाची सांगता झाली. पाच दिवसांच्या या सरावात इराणच्या लष्कराने इमाद, घद्र, सेज्जील, झलझल, देझफूल आणि झोल्फाघर अशी वेगवेगळ्या पल्ल्याच्या किमान १६ क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केले. यापैकी सातशे किलोमीटरपर्यंत मारा करणारे झोल्फाघर लघू पल्ल्याचे क्षेपणास्त्र या क्षेत्रातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले चढवू शकते, असा इशारा रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिला.
तर सेज्जील हे दोन हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र इस्रायलवर कोसळू शकतात, असे रिव्होल्युशनरी गार्ड्सने बजावले. या क्षेपणास्त्रांबरोबरच इराणने टेहळणी, हल्लेखोर तसेच आत्मघाती ड्रोन्सची देखील चाचणी घेतली. या सरावानंतर रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख जनरल सलामी यांनी इस्रायलला धमकावले.
‘नुकताच पार पडलेला हा सराव आणि प्रत्यक्ष लष्करी कारवाई यांच्यात फारसे अंतर नव्हते. या क्षेपणास्त्रांची फक्त दिशा बदलण्याचा अवकाश आहे’, अशी धमकी सलामी यांनी दिली. तर इराणच्या लष्कराचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद हुसेन बाघेरी यांनी देखील हा सराव इस्रायलसाठी इशारा असल्याचे स्पष्ट केले. ‘इस्रायलने दिलेल्या निरर्थक इशार्यांना इराणने या सरावांद्वारे उत्तर दिले आहे. इराणकडे असलेल्या शेकडो क्षेपणास्त्रांपैकी ही काही मोजकी क्षेपणास्त्रे असून ती एकाचवेळी आपल्या लक्ष्यावर मारा करू शकतात’, असा इशारा बाघेरी यांनी दिला.
गेल्या काही दिवसांपासून इस्रायल व इराणचे नेते तसेच लष्करी अधिकारी एकमेकांना धमकावत आहेत. व्हिएन्ना येथील चर्चेत चालढकल करून इराण आपल्या अणुकार्यक्रमाचा वेग वाढवित असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. अशा परिस्थितीत, व्हिएन्ना येथील अणुकराराचे महत्त्व संपुष्टात आल्याची टीका इस्रायलने केली होती. तसेच इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढविण्याचे इशारे इस्रायलच्या लष्करी अधिकार्यांनी दिले होते. आदेश मिळाले तर इस्रायलची लढाऊ विमाने दुसर्या दिवशीही इराणवर हल्ले चढवतील, असा दावा इस्रायलच्या नवनियुक्त हवाईदलप्रमुखांनी केला होता.
तर अमेरिकेच्या परवानगीशिवाय इस्रायल इराणवर हल्ला करू शकत नसल्याचे इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्याने म्हटले होते. याउलट इस्रायलवर हल्ला चढविण्यासाठी इराणला कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नसल्याची धमकी इराणने दिली होती.