इस्रायलने सिरियातील हवाईहल्ले थांबवावे

- रशियाचा इशारा

हवाईहल्लेमॉस्को – गेल्या आठवड्यात सिरियाच्या तार्तूस भागात झालेल्या हवाईहल्ल्यामुळे रशिया कमालीचा संतापला आहे. ‘सिरियाच्या सार्वभौमत्त्वाचे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या बेजबाबदार कारवाईचा रशिया कठोर शब्दात निषेध करतो. हे हवाईहल्ले कुठल्याही शर्ती व अटी न लादता बंद झाले पाहिजे’, थेट उल्लेख न करता रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी इस्रायलला फटकारले. गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा रशियाने सिरियात हवाई हल्ले चढविणाऱ्या इस्रायलला इशारा दिला आहे.

गेल्या आठवड्यात शनिवारी सकाळी सिरियाच्या तार्तूस या किनारपट्टीवरील भागात हवाईहल्ला झाला. तार्तूसच्या दक्षिणेकडील ‘अल-हमिदिया’ या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाले तर नागरी सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप सिरियन मुखपत्राने केला होता. तर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हा हल्ला चढविल्याचा ठपका सिरियाने ठेवला होता.

हवाईहल्लेया आरोपांवर इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण इस्रायली माध्यमांनी या हल्ल्यांबाबत माहिती प्रसिद्ध केली. अल-हमिदिया येथे तैनात असलेली इराणची हवाई सुरक्षा यंत्रणा या हल्ल्यात बेचिराख झाल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले होते.

सिरियातील या हल्ल्यावर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. उघड उल्लेख न करता रशियाने इस्रायलला सिरियातील हवाई हल्ले थांबविण्याची सूचना रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी केली. तसेच सिरियातील हे हल्ले अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे झाखारोव्हा यांनी बजावले. तार्तूस भागात रशियन नौदलाचा तळ आहे. याच्या किनारपट्टीकडील भागात रशियाचा हवाईतळ देखील आहे. त्यामुळे रशियाकडून ही स्वाभाविक प्रतिक्रिया आल्याचा दावा केला जातो.

हवाईहल्ले

गेल्या महिन्यात सिरियाच्या दमास्कस आंतरराष्ट्रीय विमानतळावर घणाघाती हवाई हल्ले झाले होते. यानंतरही रशियाने इस्रायलवर जोदार ताशेरे ओढले होते. त्यामुळे सिरियातील हल्ल्यावरून इस्रायल व रशिया एकमेकांसमोर खडे ठाकले आहेत. याआधी युक्रेनला शस्त्रे पुरविण्याचा निर्णयघेतल्याने रशियाने त्याविरोधात इस्रायलला समज दिली होती. रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासारख्या नेत्याला इस्रायलने शस्त्रे पुरविणे म्हणजे हिटलरला शस्त्रपुरवठा करण्यासारखे ठरते, असा शेरा मारला होता. त्यावर इस्रायलमधून जहाल प्रतिक्रिया उमटली होती. या प्रकरणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी दिलगिरी व्यक्त केली खरी. तरीही रशिया व इस्रायलमध्ये निर्माण झालेला तणाव कमी झाला नव्हता.

leave a reply