इस्रायलचा इराणच्या शेजारी तुर्कमेनिस्तानमध्ये दूतावास सुरू

israel turkmenistanअश्गाबात – मध्य आशियातील तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथे इस्रायलचा दूतावास सुरू झाला. इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यावेळी उपस्थित होते. अश्गाबात शहर इराणच्या सीमारेषेपासून अवघ्या १३ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे इस्रायलने इराणच्या सीमेजवळ दूतावास सुरू केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

turkmenistan mapइराणने सौदी अरेबिया व इतर अरब देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी वेगाने पावले टाकली आहेत. अशावेळी इस्रायलने इराणच्या शेजारी असलेल्या मध्य आशियाई देशांबरोबरचे संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. अझरबैजान या इराणच्या उत्तरेकडील देशाबरोबर इस्रायलचे व्यापारी तसेच लष्करी सहकार्य आहे. पण आता इस्रायलने तुर्कमेनिस्तान या आणखी एका इराण शेजारी देशाबरोबरील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

इस्रायलचे परराष्ट्रमंत्री एली कोहेन यांनी गुरुवारी राजधानी अश्गाबात येथे राष्ट्राध्यक्ष सरदर बेर्दीमुहमेदोव यांची भेट घेतली. इराण व तुर्कमेनिस्तानमध्ये १,१४८ किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापारी सहकार्य देखील आहे. याचा फायदा घेऊन इस्रायल अश्गाबातमार्गे इराणच्या हद्दीत आपले हेर पाठवू शकतो, असा दावा यानिमित्ताने केला जात आहे.

दरम्यान, तुर्कमेनिस्तानच्या दौऱ्यानंतर परराष्ट्रमंत्री कोहेन अझरबैजानसाठी रवाना झाले. काही दिवसांपूर्वी इस्रायलने अझरबैजानला लष्करी सहाय्य पुरविण्याचे संकेत दिले होते. यावर इराणने संताप व्यक्त केला होता.

leave a reply