अथेन्स – पुढच्या आठवड्यात ग्रीसमध्ये आयोजित होणार्या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय हवाई सरावात इस्रायलची लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. ग्रीसने या वार्षिक सरावाची घोषणा केली असून भारत, सौदी अरेबिया या देशांचे अधिकारी या सरावात निरिक्षक म्हणून सहभागी होतील. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध व नाटोच्या लष्करी हालचाली लक्षात घेता हा सराव अतिशय महत्त्वाचा ठरतो.
ग्रीसच्या हवाईदलाने दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ‘इनिओक्शोस’ हवाई सराव पार पडेल. यामध्ये ग्रीस व इस्रायलसह अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, इटली, सायप्रस, स्लोव्हेनिया आणि ऑस्ट्रिया या देशांच्या हवाईदलांचा समावेश असेल. तर भारत, सौदी अरेबिया, ब्रिटन, इजिप्त, कुवैत, अल्बानिया, नॉर्थ मॅसिडोनिया, क्रोएशिया आणि मोरोक्को या देशांचे निरिक्षक या सरावात सहभागी होणार आहेत.
ग्रीसच्या सागरी क्षेत्रापासून ते भूमध्य समुद्रापर्यंत हा सराव आयोजित केला जाणार आहे. तर सदर सराव हवाई सुरक्षा यंत्रणेविरोधातील कारवाई, हवाई हल्ले आणि बचाव मोहिमेवर आधारीत असेल. या सरावामध्ये जमिनीवरुन हवेत मारा करणार्या क्षेपणास्त्रांचा वापर केला जाईल. यामध्ये एफ-१६, एफ-१५, एफ-३५ अशा आघाडीच्या लढाऊ विमानांचा समावेश असेल, असे ग्रीस व इस्रायलच्या माध्यमांनी सांगितले. गेल्या वर्षी या सरावात रशियन बनावटीच्या एस-३०० हवाई सुरक्षा यंत्रणेचा अभ्यास करण्यात आला होता.
सध्या रशिया-युक्रेन युद्ध पेटल्यामुळे पूर्व युरोपिय देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. रशियाने अझोव्हच्या सागरी क्षेत्राचा ताबा घेतला, तर तुर्कीने बॉस्फोरसचे आखात बंद केले आहे. नाटोने युक्रेनच्या शेजारी पोलंड, रोमानिया या देशांमध्ये आपली सैन्यतैनाती वाढविली आहे. अशा परिस्थितीत ग्रीसमध्ये आयोजित होणारा सराव लक्षवेधी ठरतो.