युएईच्या सुरक्षाविषयक आवश्यकतेनुसार इस्रायल सहाय्य पुरविण्यासाठी सज्ज

- इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग

आयसॅक हर्झोगअबू धाबी/जेरूसलेम – ‘युएईच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणार्‍या कुठल्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचा इस्रायल कठोर शब्दात निषेध करतो. त्याचबरोबर युएईच्या सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेऊन इस्रायल त्यासाठी आवश्यक ते सहाय्य करील’, अशी घोषणा इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग यांनी केली. युएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झाएद यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी युएईला हे आश्‍वासन दिले. त्याचबरोबर आपला हा युएईचा दौरा म्हणजे अब्राहम करारात सहभागी होऊ इच्छिणार्‍या देशांसाठी संदेश असल्याचे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.

इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी रविवारी युएईचा दौरा करून क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झाएद यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष हर्झोग आणि शेख मोहम्मद यांच्यातील चर्चा दोन तास सुरू होती. ही चर्चा सौहार्दपूर्ण ठरल्याचे इस्रायली यंत्रणांनी जाहीर केले. युएईच्या सुरक्षाविषयक गरजा लक्षात घेऊन इस्रायल त्यासाठी आवश्यक ते सहाय्य करील, असे इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. त्याचबरोबर या क्षेत्रात शांती अपेक्षित असलेल्या देशांना पूर्ण सुरक्षा देण्यासाठी इस्रायल व युएई एकत्र आल्याचे राष्ट्राध्यक्ष हर्झोग या भेटीनंतर म्हणाले. ‘अब्राहमची मुले-मुली मानवतेच्या फायद्यासाठी शांततापूर्ण सहजीवन जगू शकतात, हा पर्याय अजूनही आपल्याकडे आहे. या क्षेत्रातील देशांना हा संदेश देण्यासाठी आपली ही युएई भेट महत्त्वाची ठरते’, असे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष यांनी जाहीर केले. युएईचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद यांनी इस्रायली राष्ट्राध्यक्षांच्या या संदेशाचे स्वागत केले. तसेच, ‘या क्षेत्राच्या स्थैर्य आणि शांततेसाठी धोकादायक ठरणार्‍या कट्टरपंथिय व दहशतवाद्यांविरोधात युएई व इस्रायल यांचे एकमत आहे’, असे युएईचे क्राऊन प्रिन्स यांनी म्हटले आहे. तसेच इस्रायल व युएई यांच्यात प्रस्थापित झालेले सहकार्य पूर्ण जोशात पुढे जात असल्याचा दावा क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद यांनी केला.

इस्रायल आणि युएईच्या राष्ट्रप्रमुखांनी उघडपणे उल्लेख केला नसला तरी इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना लक्ष्य केल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी येमेनमधील हौथी बंडखोरांनी युएईची राजधानी अबू धाबीवर ड्रोन्स व बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले होते. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद यांच्याशी फोनवरुन चर्चा करून या हल्ल्यांचा निषेध केला होता. तसेच युएईवरील दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी आवश्यक ते सहाय्य पुरविण्याची घोषणाही बेनेट यांनी केली होती. इस्रायलच्या लष्कराला त्यासाठी तयार राहण्याचे आदेश पंतप्रधान बेनेट यांनी दिले. अशा परिस्थितीत, इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी युएईचा दौरा करून आखाती क्षेत्रासह जगाला फार मोठा संदेश दिल्याचा दावा इस्रायली व आखातातील माध्यमे करीत आहेत. नजिकच्या काळात याचे फार मोठे परिणाम संभवतात.

leave a reply