जेरूसलेम – इतर अरब देशांप्रमाणे सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये सहकार्य प्रस्थापित झाले तर सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष कायमस्वरुपी संपुष्टात येईल. याचा सौदीलाही सर्वाधिक फायदा होईल, असा विश्वास इस्रायलचे पंतप्रधान नियुक्त बेंजामिन नेत्यान्याहू यांनी व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी अरब देशांशी अब्राहम कराराद्वारे सहकार्य प्रस्थापित करणाऱ्या नेत्यान्याहू यांनी सौदी देखील या करारात लवकरच सहभागी होईल, असा दावा केला आहे. येत्या काही दिवसात पंतप्रधान नियुक्त नेत्यान्याहू आपले सरकार स्थापन करणार आहेत. नेत्यान्याहू यांच्या सरकारमध्ये जहालमतवादी नेत्यांना संधी मिळू शकते, असा दावा केला जातो. असे झाले तर अमेरिका, युरोपिय देश तसेच आखातातील मित्र व सहकारी देशांकडून यावर प्रतिक्रिया येऊ शकते. त्यामुळे नेत्यान्याहू यांचे नवे सरकार आणि परराष्ट्र धोरण काय असेल, याकडे उत्सूकतेने पाहिले जात आहे. इस्रायलमधील पॉडकास्टमध्ये बोलताना बेंजामिन नेत्यान्याहू यांनी अब्राहम करार आणि सौदी अरेबिया व रशियाबाबतची आपली भूमिका मांडली.
सर्वात आधी इस्रायल आणि अरब देशांमध्ये झालेल्या अब्राहम कराराविषयी नेत्यान्याहू यांनी आपले विचार मांडले. ‘युएई, बाहरिन, सुदान आणि मोरोक्को या चार अरब देशांनी इस्रायलबरोबर अब्राहम करार केला. असे असले तरी सौदी अरेबियाच्या मान्यतेशिवाय अरब देशांनी हा करार केलाच नसता. कारण आखातातील शेजारी मोठा देश असलेल्या सौदीचे सदर सहकार्याबाबत मत घेतल्याशिवाय अरब देश हे पाऊल उचलूच शकत नाहीत. सौदी देखील या सहकार्याबाबत सकारात्मक होता, हे निश्चितपणे सांगू शकतो’, असा दावा नेत्यान्याहू यांनी केला.
येत्या काळात इतर अरब देशांप्रमाणे इस्रायल आणि सौदीमध्ये सहकार्य प्रस्थापित झाले तर यामुळे सर्व प्रश्न सुटतील, असेही नेत्यान्याहू पुढे म्हणाले. ‘इस्रायलबरोबरच्या सहकार्यामुळे सौदीसाठी रेल्वेची सेवा खुली होईल. तसेच सौदीतील व्यावसायिकांना या सहकार्याचा लाभ मिळेल. इस्रायलच्या नाविन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानाचा सौदीलाही फायदा घेता येईल’, याकडे नेत्यान्याहू यांनी लक्ष वेधले. याआधीही पंतप्रधानपदावर असताना नेत्यान्याहू यांनी आखातातील इतर देश देखील अब्राहम करारात सामील होण्यासाठी उत्सूक असून यामध्ये सौदीचा समावेश असल्याचे म्हटले होते.
इस्रायल आणि सौदीमध्ये उघड सहकार्य नसले तरी दोन्ही देशांच्या यंत्रणा व अधिकाऱ्यांमध्ये छुपे सहकार्य असल्याच्या बातम्या पाश्चिमात्य माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. न्यूयॉर्क, लंडन येथील सुरक्षाविषयक बैठकांमध्ये इस्रायल व सौदीच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले होते. इराणबाबतच्या प्रश्नावर इस्रायल व सौदीमध्ये सहकार्य असल्याचा दावाही काही माध्यमांनी केला होता. २०२० सालच्या नोव्हेंबर महिन्यात नेत्यान्याहू यांनी सौदीच्या निओम शहराला छुपी भेट देऊन क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतल्याच्या बातम्या इस्रायली माध्यमांनीच दिल्या होत्या. पण यावर दोन्ही देशांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते.