तेल अविव – ‘पाश्चिमात्य देश आणि इराण यांच्यात अणुकराराबाबत होणार्या चर्चेत काहीही झाले तरी हरकत नाही. इस्रायल स्वसंरक्षणासाठी पूर्ण सज्ज आहे’, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी दिला. अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणबरोबर चर्चा करण्याच्या तयारीत असताना पंतप्रधान बेनेट यांनी हा सुस्पष्ट संदेश दिल्याचे बोलले जाते. इस्रायलच्या संरक्षणदलाने आयोजित केलेल्या लष्करी सरावाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान बेनेट यांनी इराणसह इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना बजावले.
येत्या दहा दिवसात व्हिएन्ना येथे अमेरिका, युरोपिय देश आणि इराण यांच्यात अणुकराराबाबत चर्चा पार पडणार आहे. बायडेन प्रशासनाने लावलेल्या तगाद्यानंतर इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी या चर्चेसाठी तयार झाले. पण आपल्या मागण्या मान्य होणार असतील, तरच चर्चेत सहभागी होणार असल्याचे इराणने ठणकावले होते. त्यामुळे बायडेन प्रशासन इराणबरोबरचा अणुकरार टिकविण्यासाठी धोकादायक वाटाघाटी करणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
इस्रायलची सुरक्षा धोक्यात टाकणार्या या वाटाघाटींबाबत पंतप्रधान नफ्ताली बेनेट आणि संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी उघडपणे इशारा दिला. ‘इस्रायल सध्या लेबेनॉन आणि सिरियामध्ये इराण व इराणसंलग्न दहशतवादी गटांचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत, अणुकराराचे उघडपणे उल्लंघन करणार्या इराणच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यात पाश्चिमात्य देश अपयशी ठरत आहेत, ही इस्रायलसाठी अतिशय चिंतेची बाब ठरते. त्यामुळे इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील चर्चेत काहीही झाले तरी हरकत नाही, कारण इस्रायल स्वसंरक्षणासाठी सज्ज आहे’, असे पंतप्रधान बेनेट म्हणाले.
इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी देखील पंतप्रधान बेनेट यांच्या भूमिकेला दुजोरा दिला. ‘अणुकार्यक्रमाबाबतची इराणची धोरणे इस्रायल व्यवस्थित ओळखून आहे. त्याचबरोबर सिरिया आणि लेबेनॉनमधील दहशतवाद्यांना शस्त्रसज्ज करण्यातील इराणचे योगदानही जगाला ठाऊक आहे. अशा परिस्थितीत, इस्रायल आवश्यक ती कारवाई करायला तयार आहे. पण आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणविरोधात कारवाई करण्याची गरज आहे’, असे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी बजावले.
गेल्या दोन दिवसामपासून उत्तर इस्रायलमध्ये इस्रायलच्या लष्कराचा मोठा सराव सुरू आहे. यामध्ये इस्रायली लष्कराच्या ‘गोलानी ब्रिगेड’चे तीन हजार जवान, रणगाडे, लष्करी वाहने तसेच रिझर्व्ह फोर्सेस देखील सहभागी झाल्या आहेत. येत्या काळात लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या इराणसंलग्न दहशतवादी संघटनेबरोबर संघर्ष पेटलाच तर त्याची तयारी या सरावात केली जात आहे. पंतप्रधान बेनेट आणि संरक्षणमंत्री गांत्झ यांनी या सरावाला भेट दिली. यानंतरच इस्रायलच्या दोन्ही नेत्यांनी इराणला इशारा देण्याबरोबरच अमेरिकेला संदेश दिल्याचे दिसत आहे.
बायडेन प्रशासन इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत बोटचेपे धोरण स्वीकारत असल्याचा आरोप तीव्र होत आहे. यामुळे इस्रायल व आखाती देशांचा अमेरिकेवरील अविश्वास वाढत असल्याची टीका अमेरिकेचे विरोधी पक्षनेते करीत आहेत. तर इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलने बायडेन प्रशासनावर विसंबून राहू नये, असे सल्ले अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ व संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी काही दिवसांपूर्वीच दिले होते. इस्रायल देखील इराणच्या अणुप्रकल्पांवर हवाई हल्ल्याची तयारी करीत असल्याचे जाहीर करीत आहे.