इराणच्या ड्रोन्सविरोधात इस्रायल हवाई सुरक्षा भक्कम करणार

हवाई सुरक्षाजेरूसलेम – इराणी बनावटीच्या ड्रोन्सकडून असलेला धोका लक्षात घेऊन इस्रायलच्या लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत. पुढच्या दोन वर्षात अशी हवाई सुरक्षा यंत्रणा तयार असेल, अशी माहिती इस्रायलच्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. चार दिवसांपूर्वी सिरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर ड्रोन हल्ला झाला होता. इराण किंवा इराणसंलग्न गटांनी हा हल्ला चढविल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर इस्रायलने ड्रोनभेदी हवाई सुरक्षा यंत्रणा विकसित करीत असल्याचे संकेत दिले आहेत.

इस्रायलच्या लष्कराकडे रॉकेट्स, क्षेपणास्त्रांचे तसेच लढाऊ विमानांचे हल्ले भेदण्यासाठी प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा आहेत. लघू पल्ल्याच्या रॉकेट्ससाठी इस्रायल वापरत असलेल्या आयर्न डोम या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या खरेदीसाठी अमेरिकाही उत्सुक आहे. याशिवाय इस्रायलच्या लष्कराने डेव्हिडस् स्लिंग, ऍरो, पॅट्रियट अशा प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा सिरिया, लेबेनॉनच्या सीमेवर तैनात केल्याचा दावा केला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून इराणकडून असलेल्या ड्रोन हल्ल्याचा धोका वाढल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. यासाठी २०१९ साली सौदीच्या अराम्को इंधन प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा दाखला माध्यमे देत आहेत. अराम्कोवरील हल्ल्यानंतर ड्रोन्सपासून असलेला धोका वाढत चालल्याचे या माध्यमांचे म्हणणे आहे. काही महिन्यांपूर्वी पर्शियन आखातात मालवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ला झाला होता. तर तीन महिन्यांपूर्वी सिरियातून उड्डाण केलेल्या ड्रोनने जॉर्डनच्या सीमेतून इस्रायलमध्ये घुसण्याचा अपयशी प्रयत्न केला होता, याची आठवण ही माध्यमे करून देत आहेत.

इराणमध्ये ड्रोन्सचा मोठा तळ असून त्याचे फोटोग्राफ्स व माहिती संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी गेल्या महिन्यातच प्रसिद्ध केली होती. तर काही दिवसांपूर्वीच इराणने हवाई सराव आयोजित केला होता. यामध्ये बॉम्बर विमानांबरोबर ड्रोन्सचही सहभाग होता. लेबेनॉनमधील हिजबुल्लाह, इराक-सिरियातील इराणसंलग्न गट, येमेनमधील हौथी बंडखोर इराणी बनावटीच्या ड्रोन्सने सज्ज आहेत.

यापैकी हौथी बंडखोरांचे ड्रोन हल्ले सौदी अरेबियाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरत असल्याचा इशारा सौदी तसेच आखातातील विश्‍लेषक देत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये सौदीच्या हवाईतळापासून प्रवासी विमानतळांवरही हौथींनी ड्रोन्सद्वारे हल्ले चढविले आहेत. तर गेल्या आठवड्यात सिरियाच्या अल-तन्फ येथील अमेरिकेच्या लष्करी तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे देखील इराण असल्याचे आरोप अमेरिकेचे अधिकारी करीत आहेत.

त्यामुळे येत्या काळात इराण उघडपणे किंवा सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या सहाय्याने ड्रोन्सद्वारे हल्ले चढवून इस्रायलच्या सुरक्षेला आव्हान देऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर, ड्रोन्सचे हल्ले हाणून पाडण्यासाठी इस्रायलचे लष्कर स्वतंत्र हवाई सुरक्षा यंत्रणा विकसित करीत आहे. पुढच्या दोन वर्षात सदर यंत्रणा कार्यान्वित होईल, असा दावा इस्रायली वर्तमानपत्राने केला.

leave a reply