अमेरिकेच्या दबावामुळे इस्रायलने युक्रेनला सामरिक साहित्य पुरविले

- इस्रायली वर्तमानपत्राचा दावा

सामरिक साहित्यतेल अविव – रशियाबरोबर संघर्ष करणाऱ्या युक्रेनला लष्करी सहाय्य करण्यासाठी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने इस्रायलवर दबाव टाकला. त्यामुळे इस्रायलने युक्रेनला कोट्यवधी डॉलर्सचे सामरिक साहित्य पुरविले आहे. या सहकार्याची माहिती रशियापर्यंत पोहोचून द्विपक्षीय संबंध फिस्कटू नये, यासाठी इस्रायलने याची माहिती दडवून ठेवली होती, असा दावा ‘हारेत्झ’ या इस्रायलच्या वर्तमानपत्राने केला.

काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने इस्रायलकडे युक्रेनला लष्करी सहाय्य, विशेषत: विमानभेदी यंत्रणा पुरविण्यासंदर्भात आवाहन केले होते. इस्रायलचे विद्यमान पंतप्रधान येर लॅपिड यांनी लष्करी सहाय्य पुरविण्याचे नाकारले होते. पण बायडेन प्रशासनाने दबाव टाकल्यानंतर इस्रायलने युक्रेनला सामरिक साहित्याचा पुरवठा करण्याचे मान्य केले. नाटोमधील सदस्य देशाच्या माध्यमातून इस्रायलने कोट्यवधी डॉलर्सचे साहित्य युक्रेनला पोहोचविल्याचे इस्रायली वर्तमानपत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे.

इस्रायलने युक्रेनला लष्करी सहाय्य पुरविल्याचे कळल्यास रशियाकडून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते, या भीतीने इस्रायलने सदर सहकार्याची माहिती गोपनीय ठेवली होती. युरोपमधील तीन वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांचा हवाला देऊन इस्रायली वर्तमानपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली. नाटोमधील कोणत्या देशाच्या माध्यमातून इस्रायलने सदर सहाय्य युक्रेनला पुरविले, याचा खुलासा झालेला नाही. पण इस्रायलने पोलंडमार्फत ड्रोनभेदी यंत्रणा पुरविल्याची माहिती याआधी समोर आली होती.

दरम्यान, इस्रायली वर्तमानपत्राने प्रसिद्ध केलेल्या या माहितीनंतर रशियाकडून त्यावर प्रतिक्रिया अपेक्षित आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान नियुक्त बेंजामिन नेत्यान्याहू यांचे या युद्धाबाबतचे धोरण काय असेल, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

leave a reply