इस्रायलकडून ‘आयर्न डोम’च्या नौदल आवृत्तीची चाचणी

‘आयर्न डोम’तेल अविव – आपल्या लष्करी तंत्रज्ञानाने साऱ्या जगाला अवाक करणाऱ्या इस्रायलने ‘आयर्न डोम’ या हवाई सुरक्षा यंत्रणेच्या नौदल आवृत्तीची चाचणी घेतली. सागरी क्षेत्रातून होणाऱ्या हल्ल्यांचा सामना करण्यात आपली ही यंत्रणा यशस्वी ठरेल, असा दावा इस्रायलच्या संरक्षण मंत्रालय व नौदलाने केला. लवकरच सदर यंत्रणा इस्रायली नौदलात सामील होणार आहे. दरम्यान, ओमानच्या आखातात इस्रायली इंधनवाहू टँकरवर झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने सागरी आयर्न डोमच्या चाचणीची घोषणा करून इराण व संलग्न दहशतवादी संघटनांना इशारा दिल्याचा दावा केला जातो.

इस्रायलने आपल्या हवाई सीमेच्या सुरक्षेसाठी बहुस्तरीय क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात केल्या आहेत. लढाऊ विमाने भेदण्यासाठी इस्रायलने अमेरिकेची पॅट्रियॉट यंत्रणा बसविली आहे. तर लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांसाठी स्वदेशी बनावटीची ‘ॲरो’ आणि मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांसाठी ‘डेव्हिड्स स्लिंग्ज’ या यंत्रणा गाझा, लेबेनॉनच्या सीमेजवळ तैनात केल्या आहेत. तर ‘आयर्न डोम’ ही लघू पल्ल्याच्या रॉकेट्स हल्ल्यांना यशस्वीरित्या हाणून पाडत आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आयर्न डोमने गाझातून झालेल्या रॉकेट्सचा वर्षाव मोडून काढला होता.

‘आयर्न डोम’आता याच आयर्न डोमची नौदल आवृत्ती अर्थात ‘सी-डोम’ इस्रायलने तयार केली आहे. गेल्या महिन्यात सी-डोमची शेवटची यशस्वी चाचणी पार पडल्याची माहिती इस्रायलचे संरक्षण मंत्रालय व नौदलाने जाहीर केली. ‘आयएनएस ओझेड’ या सार-६ श्रेणीतील विनाशिकेवरुन ही चाचणी घेण्यात आली. खऱ्याखुऱ्या हल्ल्यांचा वापर करून सी-डोमची चाचणी घेतल्याचे संरक्षण मंत्रालय व नौदलाने संयुक्त निवेदनात स्पष्ट केले. सार-६ श्रेणीतील विनाशिकांचा वापर भूमध्य समुद्रातील इस्रायली इंधनवायूचे प्रकल्प आणि इंधनवाहू जहाजांच्या सुरक्षेसाठी केला जातो.

या यशस्वी चाचणीमुळे इस्रायली विनाशिकांची सज्जता वाढेल, असा दावा इस्रायली संरक्षण मंत्रालयाने केला. गेल्या आठवड्यात झालेल्या या चाचणीची माहिती उघड करण्यासाठी इस्रायली संरक्षण मंत्रालयाने निवडलेल्या वेळेकडे स्थानिक माध्यमे लक्ष वेधत आहेत. गेल्या आठवड्यात ओमानच्या किनारपट्टीजवळून निघालेल्या इस्रायली इंधनवाहू टँकर ड्रोन हल्ला झाला होता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सनी इस्रायली मालकीच्या या जहाजावर हल्ला चढविल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. पण इस्रायलने इराणला थेट जबाबदार धरण्याचे टाळले होते.

पर्शियन आखातातील इराणच्या नौदलाच्या कारवाया अमेरिकन युद्धनौकांसाठी देखील आव्हान ठरत आहेत. इराणच्या गस्तीनौकांनी अमेरिकेसह युरोपिय देशांच्या विनाशिकांचा धोकादायक पाठलाग केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर इराणच्या ड्रोन्सनी अमेरिकी युद्धनौकेचे व्हिडिओ चित्रित केल्याची माहिती समोर आली होती. अशा परिस्थितीत, ‘सी-डोम’च्या यशस्वी चाचणीची घोषणा करून इस्रायलने इराणला इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply