अबु धाबी – ‘संयुक्त अरब अमिरात’सह (युएई) हवाई आणि सागरी वाहतुक सुरू केल्यानंतर इस्रायलने आपल्या नव्या सहकारी देशासह व्यापार वाढविण्याची तयारी केली आहे. यासाठी इस्रायल आणि युएईमध्ये लँड कॉरिडोर उभारण्याची योजना तयार केल्याची माहिती इस्रायलने युएईसाठी नियुक्त केलेले राजदूत इतान नाएह यांनी सांगितले. असे झाले तर दोन्ही देशांमधील व्यापारी वाहतुक सहज होईल तसेच युरोप आणि आशियाई देश देखील जोडले जातील, असा दावा नाएह यांनी केला.
गेल्या वर्षी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने इस्रायल आणि युएईमध्ये ऐतिहासिक अब्राहम करार पार पडला. यानंतर इस्रायल आणि युएईमध्ये सहकार्याचे नवे पर्व सुरू झाले आहे. या सहकार्याअंतर्गत गेल्या तीन महिन्यांमध्ये सुमारे सव्वा लाखहून अधिक इस्रायली पर्यटकांनी युएईला भेट दिली. कोरोनाचे संकट टळल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढेल, असा दावा उभय देशांकडून केला जातो. या व्यतिरिक्त दोन्ही देशांमध्ये व्यापारी वाहतुकही सुरू झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
सध्या इस्रायल आणि युएईमध्ये सागरी व हवाईमार्गे व्यापारी वाहतूक करण्यास परवानगी मिळाली आहे. यापैकी सागरीमार्गे व्यापारी वाहतुकीसाठी १६ दिवस लागत असून हवाई वाहतूक दैनंदिन केलेली नाही. त्यामुळे उभय देशांमधील वाहतूक अधिक सहज करण्यासाठी लँड कॉरिडोरचा चांगला पर्याय असल्याचे युएईतील इस्रायलचे पहिले राजदूत नाएह यांनी अमिराती वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
‘मोठ्या अवजड मालवाहू गाड्यांसाठी महामार्ग तयार केला तर येत्या काळात तीन दिवसांमध्ये मालवाहतूक होऊ शकते’, असे नाएह यांनी स्पष्ट केले. तसेच ‘युएई हा अरेबिया द्विपकल्पाच्या पूर्वेकडे आहे. तर इस्रायल आशियाच्या पश्चिमेकडील, भूमध्य समुद्राला जोडणारा देश आहे. तेव्हा हा लँड कॉरिडोर शक्य झाला तर जमीन आणि सागरीमार्गे सार्या जगाला जोडणारा मोठा महामार्ग ठरेल. तसेच यामुळे मोठी बाजारपेठ खुली होईल’, असा दावा नाएह यांनी केला.
या व्यतिरिक्त इस्रायल आणि युएईमध्ये पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानविषयक क्षेत्रातही उभय देशांमध्ये व्यापक सहकार्य प्रस्थापित होऊ शकते, याकडे इस्रायली राजदूतांनी लक्ष वेधले.