जेरूसलेम – ‘येत्या काळात अमेरिकेने इराणबरोबर नव्याने अणुकरार केलाच तर आखातातील इतर देश देखील अण्वस्त्रसज्जतेसाठी प्रयत्न करतील. असे झाले तर ते दु:स्वप्न असेल आणि मुर्खपणाचेही ठरेल. अमेरिकेने हा अणुकरार करू नये’, असा सज्जड इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी दिला. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी उत्सुक आहेत. भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी तसे जाहीरही केले होते. या पार्श्वभूमीवर, इस्रायलच्या पंतप्रधानांनी बायडेन यांना स्पष्ट शब्दात ठणकावल्याचे दिसत आहे.
अमेरिकेचे कोषागार विभागप्रमुख स्टिव्हन एम्नुकिन यांनी नुकताच इस्रायलचा दौरा केला. या दौर्यात इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहकार्यांप्रती आभार व्यक्त केले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने स्वीकारलेल्या भूमिकेमुळे इस्रायलला संयुक्त अरब अमिरात (युएई), बाहरिन आणि मोरोक्को या देशांबरोबर सहकार्य प्रस्थापित करणे शक्य झाल्याचे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले. त्याचबरोबर येत्या काळात आणखी काही अरब व इस्लामी देश इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित करतील, अशी आशा इस्रायली पंतप्रधानांनी व्यक्त केली.
तर इराणच्या अणुकराराबाबत इस्रायलची भूमिका पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी ठामपणे मांडली. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा थेट उल्लेख टाळून नेत्यान्याहू यांनी इराणशी नवा अणुकरार करू नये, असे सुचविले. इराणबरोबर नव्याने अणुकरार करणे हे मुर्खपणाचे ठरेल, असे नेत्यान्याहू म्हणाले. तसेच बायडेन प्रशासनाने इराणबरोबर नवा अणुकरार केला तर ते अण्वस्त्रप्रसारबंदी विधेयकाचे उल्लंघन ठरेल. असे झाले तर आखातातील इतर देशही अण्वस्त्रनिर्मितीसाठी प्रयत्न करतील, असा इशारा नेत्यान्याहू यांनी दिला.
दरम्यान, २०१५ साली पाश्चिमात्य देशांनी अणुकरार करून इराणला मोठ्या प्रमाणात सवलती बहाल केल्याचा आरोप इस्रायल व सौदी अरेबिया करीत आहे. या अणुकरारावर टीका करून अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणवर कठोर निर्बंध लादणे सुरू ठेवले आहे. तर बायडेन यांनी या निर्बंधांतून सुटका केली तरच अणुकरार शक्य असल्याची अट इराणने ठेवली आहे.