जेरूसलेम/तेहरान – पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इस्रायल व सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर दाखल होतील. इस्रायलच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रस्थानी ठेवून आपण सौदीला भेट देणार असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर, इराणच्या विरोधात क्षेत्रीय देशांची आघाडी उभारण्यासाठी इस्रायल अमेरिकेकडे मागणी करणार आहे. यामध्ये इस्रायलसह युएई, बाहरिन यांच्याबरोबर सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डन या देशांचा समावेश करण्याची मागणी होऊ शकते. दरम्यान, बायडेन प्रशासनाने अणुकरारासाठी इराणबरोबर वाटाघाटी सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत, इस्रायलची ही मागणी बायडेन प्रशासनाची कोंडी करू शकते.
अमेरिकेची सूत्रे हाती घेणारे राष्ट्राध्यक्ष आपल्या पहिल्या विदेश दौऱ्यात इस्रायलला प्राधान्य देतात, हा आत्तापर्यंतचा संकेत होता. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यापासून बायडेन यांनी इस्रायलला भेट दिलेली नाही. बायडेन यांच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणाचा हा भाग होता. याचा थेट परिणाम अमेरिका व इस्रायल यांच्यातील संबंधावर झाल्याचा दावा केला जातो. दीड वर्षानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन पुढच्या आठवड्यात इस्रायलमध्ये दाखल होतील. यानिमित्ताने इस्रायल अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे मोठी मागणी करील, असा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत.
इराणविरोधात इस्रायल आणि अरब देशांची आघाडी उभारण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी प्रयत्न करावे, यासाठी इस्रायल बायडेन यांच्याकडे विचारणा करणार आहे. असे झाले तर इराणच्या आण्विक, क्षेपणास्त्र कार्यक्रमाबरोबरच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांपासून धोका असलेले अरब देश या आघाडीत सहभागी होतील, असा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत. यामुळे इस्रायलसह सहकार्यात असलेले युएई, बाहरिन, इजिप्त व जॉर्डन या अरब देशांबरोबरच सौदी अरेबियासारखा प्रभावशाली आखाती देशही या आघाडीत सहभागी होऊ शकतो, असे इस्रायली विश्लेषकांचे म्हणणे आहे.
आठवड्यापूर्वी अमेरिका आणि इराण यांच्यात दोहा येथे अणुकराराबाबत चर्चा पार पडली होती. या वाटाघाटी अपयशी ठरल्या असल्या तरी येत्या काळात इराणबरोबर चर्चा शक्य असल्याचे संकेत बायडेन प्रशासन देत आहे. अशा परिस्थितीत, इराणविरोधात क्षेत्रीय देशांच्या आघाडीची मागणी करून इस्रायल बायडेन प्रशासनाला कोंडीत पकडू शकतो. तसेच यावर इराणकडून जहाल प्रतिक्रिया उमटू शकते.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा हा दौरा इस्रायल आणि अरब देशांमध्ये सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी असल्याचा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. पण इस्रायल व अरब देशांमध्ये सहकार्य निर्माण करण्यासाठी बायडेन प्रशासनाकडून केले जाणारे प्रयत्न अपयशी ठरतील, असा दावा इराणची माध्यमे करीत आहेत. इस्रायल-अरब देशांच्या या आघाडीविरोधात कतार, इराक आणि कुवैत या देशांची आघाडी उभी राहिल, असेही इराणच्या माध्यमांचे म्हणणे आहे.