इराण जगाची फसवणूक करीत असताना इस्रायल शांत राहणार नाही

- इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांचा इशारा

इराण जगाची फसवणूकजेरूसलेम – ‘आपल्या अणुकार्यक्रमाबाबत इराण जगाची फसवणूक करीत असताना, इस्रायल अजिबात शांत राहणार नाही’, असा इशारा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इस्रायली गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी दिला. त्याचबरोबर अमेरिकेसमोर इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत काही संवदेनशील गोपनीय माहिती उघड केल्याचे बार्नी यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून बायडेन प्रशासन इराणबरोबरचा अणुकरार बाजूला ठेवल्याचे संकेत देत आहेत. इस्रायलमधील निवडणुकीसाठी बायडेन प्रशासन अणुकराराचा बळी देत असल्याचा आरोप इराणी माध्यमे करीत आहेत.

अमेरिका व इराणमध्ये लवकरच अणुकरार संपन्न होईल, असे दावे अमेरिकी माध्यमांनीच बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने केले होते. येत्या काही दिवसात हा करार पूर्णत्वास जाईल, असा विश्वास अमेरिकी माध्यमांनी व्यक्त केला होता. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांच्यात फोनवरुन झ्ाालेल्या चर्चेनंतर, हा अणुकरार शक्य नसल्याची घोषणा अमेरिकेने केली. इतकेच नाही तर इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ न देण्याच्या निर्णयावर अमेरिका ठाम असल्याची ग्वाही देखील बायडेन प्रशासनाने दिली होती.

त्याचबरोबर स्वसंरक्षणासाठी इराणवर कारवाई करताना इस्रायलचे हात बांधले जाणार नाहीत, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्वतःहून इस्रायलच्या पंतप्रधानांना फोनवरुन कळविल्याचे अमेरिकेच्या राजदूतांनी जाहीर केले होते. इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’चे प्रमुख डेव्हिड बार्नी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होण्याआधी बायडेन प्रशासनाने ही घोषणा केली होती. बार्नी यांनी देखील आपल्या दौऱ्यात अमेरिकी गुप्तचर यंत्रणा सीआए, तसेच मुख्य तपास यंत्रणा एफबीआय, राष्ट्रीय सुरक्षा काऊन्सिल तर पेंटॅगॉन आणि सुरक्षादलप्रमुखांबरोबर झ्ाालेल्या बैठकीत आक्रमक भूमिका स्वीकारली.

आपल्या अमेरिका दौऱ्यात इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत इस्रायलकडे असलेले संवदेनशील गोपनिय साहित्य बायडेन प्रशासन आणि गुप्तचर यंत्रणेसमोर उघड केल्याची माहिती बार्नी यांनी दिली. तर इराण आपल्या अणुकार्यक्रमाविषयी साऱ्या जगाची फसवणूक करीत असताना, इस्रायल शांत बसणार नसल्याचे बार्नी यांनी ठणकावले. अमेरिकी सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुखांनी देखील इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिल्याची माहिती बार्नी यांनी इस्रायलमध्ये परतल्यावर दिली.

दरम्यान, बायडेन प्रशासनाने इस्रायलमधील लॅपिड यांचे सरकार वाचविण्यासाठी अणुकराराचा बळी दिल्याचा आरोप इराणच्या वृत्तसंस्थेने केला आहे. इस्रायलमधील लॅपिड यांचे सरकार अल्पमतात आले आहे. लवकरच इस्रायलमध्ये आणखी एका निवडणुकीची घोषणा होऊ शकते. असे झ्ााले तर माजी पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू पुन्हा सत्तेवर येऊ शकतात, असा दावा इस्रायलमधील विश्लेषक करीत आहेत. नेत्यान्याहू सत्तेवर आल्यास ते अणुकराराला किंमत देणार नाहीत. या पार्श्वभूमीवर, लॅपिड यांचे सरकार वाचविण्यासाठी बायडेन प्रशासन अणुकरार मागे ठेवत असल्याचे या वृत्तसंस्थेचे म्हणणे आहे.

leave a reply