वॉशिंग्टन – १९९८ साली आफ्रिकेतील दोन अमेरिकी दूतावासांमधील बाँबस्फोटांचे सूत्रसंचालन करणारा अल-कायदाच्या दुसर्या क्रमांकाच्या नेत्याचा इस्रायलच्या एजंट्सनी खातमा केला. अमेरिकेच्या इशार्यावरुन इराणमधील इस्रायली एजंट्सनी ऑगस्ट महिन्यात ही कामगिरी फत्ते केली, अशी माहिती अमेरिकी वर्तमानपत्र ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने गुप्तचर अधिकार्यांच्या हवाल्याने प्रसिद्ध केली. इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’च्या एजंट्सनी इराणमध्ये केलेली ही मोठी कारवाई असल्याचा दावा केला जातो. तर इराणने अमेरिकी वर्तमानपत्राच्या या बातमीत तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
‘अब्दुल्ला अहमद अब्दुल्ला’ उर्फ ‘अबू मुहम्म्द अल-मस्री’ याला ७ ऑगस्ट रोजी इराणची राजधानी तेहरानच्या रस्त्यावर गोळ्या घालून ठार करण्यात आले. मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी अल-कायदाच्या या नेत्याला संपविले. अल-कायदाचा म्होरक्या अयमन अल-जवाहिरी याच्यानंतर या दहशतवादी संघटनेचा दुसर्या क्रमांकाचा नेता म्हणून अबू मुहम्मद अल-मस्रीची नियुक्ती गोपनीय ठेवण्यात आली होती, असा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे. अल-कायदाने अबू मुहम्मद अल-मस्रीच्या मृत्यूची घोषणा केलेली नाही व इराणी अधिकार्यांनी देखील अबू मुहम्मदचा ठार झाल्याचे जगापासून दडवून ठेवले. कारण आपल्या देशात अल-कायदाचा एकही दहशतवादी नसल्याचे इराण याआधी निक्षून सांगत आला आहे.
मात्र, ऑगस्ट महिन्यात इराणच्या माध्यमांनी तेहरानमधील गोळीबारात ५८ वर्षीय व्यक्तीचा मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केल्याची बातमी दिली होती. तर अफगाणिस्तानच्या लष्करी सूत्रांनी गेल्याच महिन्यात एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीत, तेहरानच्या रस्त्यावर अमेरिकेच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खातमा झाल्याचे म्हटले होते. अमेरिका व इस्रायली अधिकार्यांनी देखील या बातमीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे.
अमेरिकेचे अधिकारी बरीच वर्षे इराणमधील मस्री आणि इतर कायदाच्या दहशतवाद्यांचा माग काढत होते. मस्री अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘एफबीआय’च्या मोस्ट वाँटेड यादीत होता. १९९८ साली केनियाच्या नैरोबी शहरातील अमेरिकी दूतावासावर अल-कायदाने चढविलेल्या हल्ल्याचा मस्री हा सूत्रधार होता. या हल्ल्याने अमेरिकेला हादरवून सोडले होते. त्यानंतर २००३ सालापासून मस्री इराणमध्ये वास्तव्य करुन होता. २०१५ सालापासून मस्री तेहरानमधील उच्चभ्रू वस्तीत रहात होता, असा दावा ‘द न्यूयॉर्क टाईम्स’ने केला आहे.