सिरियाच्या विमानतळावर इस्रायलचे हवाई हल्ले

siriyaदमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सिरियाची राजधानी दमास्कस आणि येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ले चढविले. यामध्ये मोठी हानी झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सिरियन लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, इस्रायल या हल्ल्यांद्वारे सिरियातील इराण व हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करीत असल्याचा दावा केला जातो.

स्थानिक वेळेनुसार, बुधवारी रात्री आठच्या सुमारास दमास्कस शहरात दोन मोठे हल्ले झाले. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यानंतर राजधानी दमास्कसजवळ झालेल्या हल्ल्यांमुळे मोठा आगडोंब उसळल्याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत. किमान तीन क्षेपणास्त्रे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हद्दीत, धावपट्टीवर कोसळल्याचा दावा स्थानिकांनी केला. याआधी जून महिन्यातही इस्रायलच्या लढाऊ विमानांनी याच भागावर जोरदार हवाई हल्ले चढविले होते. यानंतर दहा दिवसांसाठी सदर विमानतळ बंद करण्यात आले होते.

Syrian airportsविमानतळावरील इराणच्या लष्कराच्या अधिकाराखाली येणाऱ्या भागावर इस्रायलने हे हल्ले चढविले होते. यामध्ये इराणशी संलग्न असलेल्या गटाचे दहशतवादी ठार झाले होते, तर विमानतळावरील प्रवासी विभागाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर बुधवारी इस्रायली विमानांनी पुन्हा एकदा याच विमानतळाला लक्ष्य केले व या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचा दावा सिरियन वृत्तवाहिनी करीत आहे. तसेच सिरियन हवाई सुरक्षा यंत्रणांनी इस्रायली विमानांना पिटाळल्याचे सदर वृत्तवाहिनीने म्हटले आहे.

सिरियातील इराण व हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांवरील कारवाई सुरू राहणार असल्याचे इस्रायलने जाहीर केले होते. यासाठी कुणाचीही परवानगी घेणार नसल्याचे इस्रायलच्या नेत्यांनी ठणकावले होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये इस्रायलने सिरियातील आपले हल्ले वाढविले असून इस्रायल येथील इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना लक्ष्य करीत असल्याचा दावा केला जातो. इराण हा ‘ऑक्टोपस’ नामक सागरी जलचरासारखा असून त्याचे टेन्टेकल्स अर्थात दहशतवादी पाय सिरियासह इतर आखाती देशांमध्ये विस्तारलेले आहेत. सिरियात कारवाई करून इस्रायल इराणचे ‘टेन्टेकल्स’ कापून काढत असल्याचा दावा इस्रायली विश्लेषक करीत आहेत.

leave a reply