बैरूत – सिरियाच्या उत्तरेकडील होम्स प्रांतात इस्रायलच्या लढाऊ विमानांनी जोरदार हवाई हल्ले चढविले. यामध्ये तीन नागरिक जखमी झाल्याचा आरोप सिरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला. तर सिरियन लष्कराच्या विमानतळावरील हिजबुल्लाहचे शस्त्रास्त्रांचे कोठार या कारवाईत उद्ध्वस्त झाल्याचा दावा सिरियन मानवाधिकार संघटनेने केला. गेल्या महिन्याभरात इस्रायलची ही सिरियातील दहावी तर होम्समधील दुसरी कारवाई असल्याचे स्थानिक माध्यमे लक्षात आणून देत आहेत. काही दिवसांपूर्वीच इस्रायलने सिरियाच्या गोलन टेकड्यांमधील हिजबुल्लाहचे तळ लक्ष्य केले होते. त्यामुळे लेबेनॉनस्थित हिजबुल्लाह इस्रायलच्या निशाण्यावर असल्याचे दिसत आहे.
सिरियातील अस्थैर्याचा फायदा घेऊन इराण इस्रायलविरोधी कारस्थाने रचत असल्याचा आरोप इस्रायलने केला होता. इराण सिरियामध्ये हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांचे तळ उभारून तसेच शस्त्रास्त्रांची तस्करी करून इस्रायलवर हल्ल्याची तयारी करीत असल्याचा ठपका इस्रायलने ठेवला होता. इराणच्या या इस्रायलविरोधी कारवाया रोखल्या नाही तर सिरियातील इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांना लक्ष्य करणार असल्याचा इशारा इस्रायलने दिला आहे. त्यामुळे सिरियातील इस्रायलचे हवाई हल्ले इराण व इराणसंलग्न गटांना इशारा असल्याचा दावा केला जातो.
शनिवारी पहाटे सिरियाच्या होम्स शहरातील हल्ला देखील इराणसंलग्न हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला लक्ष्य करणारा होता. होम्स येथील सिरियन लष्कराच्या हवाईतळावर हिजबुल्लाहने शस्त्रास्त्रांचे कोठार आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी नेमक्या याच ठिकाणावर हल्ले चढविले, त्यामुळे मोठा आगडोंब उसळल्याचा दावा ब्रिटनस्थित सिरियन मानवाधिकार संघटनेने केला. पण सिरियन लष्कराने या हल्ल्याबाबत वेगळीच माहिती दिली आहे. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी होम्समधील लष्करी विमानतळाजवळील ठिकाणाला लक्ष्य केले.
यामध्ये इंधनाने भरलेल्या कोठाराने पेट घेतला तसेच येथील काही ट्रक्स देखील या आगीत सापडले. इस्रायलच्या या हल्ल्यात तीन सिरियन नागरिक जखमी झाले. तर सिरियन हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलची काही क्षेपणास्त्रे हाणून पाडल्याचा दावा सिरियन लष्कराने केला. सिरियातील या हल्ल्यांबाबत इस्रायलने नेहमीच प्रतिक्रिया न देण्याची भूमिका स्वीकारली आहे. पण इस्रायलचा हा हल्ला इराण तसेच हिजबुल्लाहला देखील इशारा असल्याचा दावा केला जातो. गेल्या महिन्याभरात इस्रायलने सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे.
2 एप्रिल रोजी देखील इस्रायलने होम्समधील हिजबुल्लाहच्या याच ठिकाणावर हल्ला चढविला होता. तर गेल्या आठवड्यात सिरियाच्या गोलान भागातील हिजबुल्लाहच्या तळांवर इस्रायलच्या तोफांनी हल्ले केले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाहचे दहशतवादी ठार झाले होते. शनिवारच्या कारवाईत देखील हिजबुल्लाहची जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येते.
दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दुल्लाहियान यांनी शुक्रवारी लेबेनॉनचा दौरा करून इस्रायलच्या सीमेजवळील भागाला भेट दिली. त्यानंतर सिरियातील हिजबुल्लाहच्या ठिकाणावर हल्ले चढवून इस्रायलने इराणला बजावल्याचे दिसत आहे.
इस्रायल-लेबेनॉन सीमेला इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट
बैरूत – आखाती देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठी दौऱ्यावर निघालेले इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दोल्लाहियान यांनी शुक्रवारी लेबेनॉनमध्ये दाखल झाले. लेबेनॉनमधील हिजबुल्लाहचे समर्थन असलेल्या सरकारबरोबर चर्चा केल्यानंतर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी थेट इस्रायलच्या सीमेजवळील ‘मरुन अल-रास’ला भेट दिली. 2006 सालच्या युद्धात याच भागातून हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर रॉकेट्सचे हल्ले चढविले होते.
लेबेनॉनमध्ये सध्या राजकीय अस्थैर्य आहे. हिजबुल्लाहचा प्रभाव असलेले सरकार बाद करून देशात नवी निवडणूक घेण्याची मागणी राजकीय विरोधकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लेबेनॉनचा दौरा करून आपल्या समर्थक गटांशी चर्चा केली. त्यानंतर शुक्रवारी उशीरा परराष्ट्रमंत्री हुसेन आमिर अब्दोल्लाहियान यांनी इस्रायलच्या सीमेजवळील मरुन अल-रास गावाला भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली.
या गावात हिजबुल्लाह समर्थकांची वस्ती आहे. त्यामुळे इस्रायलविरोधी कारवाईसाठी या गावाचा वापर केला जातो. अशा या गावाला भेट देऊन इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलला इशारा दिल्याचे दिसत आहे. अब्दोल्लाहियान यांची ही भेट इस्रायलला चिथावणी देणारी असल्याचा दावा केला जातो.