इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबियाला छुपी भेट दिली

- इराणच्या माध्यमांचा दावा

तेहरान – ‘अब्राहम कराराच्या परिवारात सौदी अरेबिया सामील झाला तर मी उघडपणे सौदीला भेट देईन’, अशी घोषणा इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयसॅक हर्झोग यांनी केली. इस्रायलच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने स्थानिक दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी सौदीला अब्राहम करारात सहभागी होण्याचे आवाहन केले. पण इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी सौदीला गुप्तपणे भेट दिल्याचा दावा इराणची माध्यमे करीत आहेत. हर्झोग यांचे खाजगी विमान सौदीची राजधानी रियाधमध्ये उतरल्याचे इराणी माध्यमांचे म्हणणे आहे.

इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबियाला छुपी भेट दिली - इराणच्या माध्यमांचा दावाइस्रायल 74 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करीत आहे. या निमित्ताने राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी एका मुलाखतीत इतर अरब देशांप्रमाणे सौदीबरोबर सहकार्य प्रस्थापित करायला आवडेल, असे म्हटले होते. तसेच अब्राहम करारात सौदीने सहभागी व्हायचे की नाही, हे फक्त इस्रायलवर नाही तर सौदी अरेबिया आणि अमेरिका-सौदी यांच्यातील संबंधांवर अवलंबून असल्याचे सूचक विधान राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी केले होते. इस्रायली राष्ट्राध्यक्षांच्या मुलाखतीचा हा छोटा भाग प्रसिद्ध करण्यात आला होता. पण ही मुलाखत पूर्णपणे प्रसिद्ध होण्याआधीच इराणच्या माध्यमांनी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष सौदीमध्ये पोहोचल्याच्या बातम्या दिल्या.

इस्रायलच्या तेल अविव शहरातून ‘9एच-जेपीसी’ खाजगी विमान सौदीची राजधानी रियाधमध्ये उतरले. त्याआधी या विमानाने जॉर्डनमध्ये थांबा घेतला होता, असे इराणच्या वर्तमानपत्राने म्हटले आहे. या खाजगी विमानातून इस्रायली राष्ट्राध्यक्ष हर्झोग यांनी सौदीचा प्रवास केल्याचा दावा या वृत्तसंस्थेने केला. इराणच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने देखील इस्रायली विमान सौदीच्या रियाधमध्ये उतरल्याची बातमी दिली. पण इस्रायली विमान कधी सौदीत उतरले, याचे तपशील इराणच्या माध्यमांनी दिले नाहीत.

इस्रायल आणि सौदीचे नेते किंवा अधिकाऱ्यांमधील ही पहिली भेट नसल्याचे इराणी वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. 2020 सालच्या सप्टेंबर महिन्यात इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली होती. सौदीच्या निओम शहरात ही भेट झाल्याचे इराणी वृत्तवाहिनी लक्षात आणून देत आहे.

इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी सौदी अरेबियाला छुपी भेट दिली - इराणच्या माध्यमांचा दावात्याच वर्षी इस्रायल आणि सौदीने एकमेकांच्या प्रवासी विमानांसाठी हवाईहद्द मोकळी करण्याचा निर्णय घेतला होता, याची आठवण इराणच्या वृत्तवाहिनीने करून दिली. गेल्या महिन्यात सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकी माध्यामाशी बोलताना, सौदी इस्रायलला शत्रू देश मानत नसल्याचे म्हटले होते. तसेच पॅलेस्टाईनचा मुद्दा सुटला तर इस्रायलबरोबर सहकार्यही प्रस्थापित होऊ शकते, असे संकेत सौदीच्या क्राऊन प्रिन्स मोहम्मद यांनी दिले होते.

दरम्यान, 2020 साली युएई आणि बाहरिन या देशांनी इस्रायलबरोबर अब्राहम करार केला. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने हा करार पार पडला होता. अरब देशांचे नेतृत्त्व करणाऱ्या सौदी अरेबियाच्या मर्जीशिवाय युएई आणि बाहरिन यांनी इस्रायलशी करार करणे शक्य नसल्याचे इराणी वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. सौदीच्या परवानगीनंतरच युएई, बाहरिन व पुढे जाऊन मोरोक्को आणि सुदान या देशांनी इस्रायलसह सहकार्य प्रस्थापित केल्याचा दावा इराणी वृत्तवाहिनीने केला. मात्र इस्लामी जगताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतील ही शक्यता लक्षात घेऊन सौदी अरेबिया अब्राहम करारात सहभागी झालेला नाही, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. असे असले तरी सौदी अरेबिया जगजाहीर न करता इस्रायलबरोबर वेगवेगळ्या पातळ्यांवर सहकार्य करीत असल्याचे आरोप इराण व सौदीच्या विरोधात असलेले इतर देश करीत आहेत.

leave a reply