तेहरान – गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरियातील इराणच्या कुद्स फोर्सेसच्या ठिकाणांवर चढविलेल्या हल्ल्यांवर इराणने धमकी दिली आहे. ‘सिरियात हल्ले चढवून पळ काढणाऱ्या इस्रायलचा काळ संपत आला आहे. सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यांना यापुढे उत्तर मिळेल’, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने धमकावले.
सिरियातील इराणच्या जवानांची तैनाती ही फक्त सल्लागार म्हणून आहे. त्यामुळे इराणच्या या जवानांवर हल्ला झालाच तर सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी दिला. पण इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे जवान ठार झाले नसल्याचा दावा खातिबझादेह यांनी केला.
गेल्या आठवड्यात इस्रायलने सिरियात चढविलेल्या हल्ल्यात 14 जण ठार झाले होते. यात इराणच्या कुद्स फोर्सेसचे जवान तसेच इराणसंलग्न गटाच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा स्थानिक मानवाधिकार संघटनेने केला होता.