‘रिसॅट’च्या संशोधनामुळे आपल्यावर विषप्रयोग झाल्याचा इस्रोच्या वैज्ञानिकाचा दावा

अहमदाबाद – स्वदेशी बनावटीचे ‘रडार इमेजिंग सॅटेलाईट्स’(रिसॅट) विकसित करण्यासाठी दिलेल्या योगदानामुळे आपल्याविरोधात विषप्रयोगाचे प्रयत्न झाले असावेत, असा खळबळजनक दावा ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’तील (इस्रो) वरिष्ठ वैज्ञानिक व सल्लागार तपन मिश्रा यांनी केला. भारत सरकारकडून मिळणारी कंत्राटे गमावण्याची भीती असलेल्यांकडून विषप्रयोगाचे प्रयत्न झाले असावेत, असृ मिश्रा यांनी म्हटले आहे. अहमदाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या तपन मिश्रा यांनी ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर’चे संचालक जबाबदारी पार पाडली असून सध्या ते ‘इस्रो’त वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

मंगळवारी ‘इस्रो’तील वैज्ञानिक व वरिष्ठ सल्लागार तपन मिश्रा यांनी, सोशल मीडियावर ‘लाँग केप्ट सिक्रेट’ या शीर्षकाखाली एक पोस्ट प्रसिद्ध केली. या पोस्टमध्ये त्यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्यावर झालेल्या विषप्रयोगाची माहिती दिली. ‘२३ मे, २०१७ रोजी इस्रोच्या बंगळुरुमधील मुख्यालयात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान आपल्यावर प्राणघातक आर्सेनिक ट्रायऑक्साईडच्या सहाय्याने विषप्रयोग करण्यात आला. या विषप्रयोगानंतर जुलै महिन्यात एका वरिष्ठ सुरक्षा अधिकार्‍याने माझी भेट घेतली. आपल्याविरोधात आर्सेनिकचा वापर झाल्याचे सांगून डॉक्टरांना अचूक उपचार सुचविण्यासही या अधिकार्‍याने सहाय्य केले. या विषप्रयोगानंतर आपल्याला श्‍वसनाचा त्रास तसेच त्वचेच्या गंभीर विकारांना तोंड द्यावे लागले’, असे मिश्रा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

तपन मिश्रा यांनी सोशल मीडियावर नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयाने दिलेला आर्सेनिकच्या विषप्रयोगासंदर्भातील अहवालही प्रसिद्ध केला आहे. अशा घटनांची माहिती सर्वांना मिळावी आणि भविष्यात अशी कृत्ये करणार्‍यांना जरब बसावी, या उद्देशाने आपण संपूर्ण घटनाक्रम उघड करण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा मिश्रा यांनी केला. अहमदाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ‘इस्रो’च्या वरिष्ठ वैज्ञानिकांनी, आपल्यावरील विषप्रयोगामागे ‘रिसॅट’ विकसित करण्यासाठी केलेले संशोधन कारणीभूत ठरले असावे, असा दावाही केला. ‘रिसॅट’मुळे दिवसा व रात्रीही तसेच ढगाळ व धूळ असलेल्या वातावरणातही अत्यंत स्पष्टपणे ‘इमेजेस’ मिळविणे शक्य झाले. हे तंत्रज्ञान अतिशय महाग आहे व त्याची भारताला विक्री करण्याची तयारी काहीजणांनी केलेली होती. पण देशातच ‘रिसॅट’ विकसित झाल्याने त्यांचे फार मोठे नुकसान झाले आणि तसे होऊ नये यासाठी आपल्यावर विषप्रयोग करण्यात आला होता, असा खबळजनक आरोप मिश्रा यांनी केला आहे. आता हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरावे आणि सरकारने त्याची चौकशी करावी, असे आवाहन तपन मिश्रा यांनी केले आहे.

leave a reply