कैरो/आदिस अबाबा – इथिओपियाकडून नाईल नदीवर बांधण्यात धरणाच्या मुद्यावर अरब लीगने आक्रमक भूमिका घेतली आहे. धरण उभारून ते कार्यरत करताना इथिओपियाने इजिप्त व सुदान या दोन्ही देशांच्या नाईल नदीच्या पाण्यावर असलेल्या हक्कांची जाणीव ठेवावी, असे अरब लीगने बजावले आहे. त्याचवेळी या मुद्यावर अरब लीग इजिप्त व सुदानच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा इशाराही दिला आहे. इजिप्त तसेच सुदाननेही धरणाच्या मुद्यावर कडक पवित्रा घेतला असून, सुदानने लष्करी पातळीवर हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
‘नाईल नदीवर बांधण्यात येणार्या धरणाच्या मुद्यावर इजिप्त, सुदान व इथिओपियामध्ये वाटाघाटी सुरू आहेत. त्यातून सर्वांचे हितसंबंध राखणारा सर्वमान्य व कायदेशीर करार आकाराला येईल, अशी अपेक्षा आहे. धरण भरून ते कार्यरत करताना इजिप्त व सुदान या दोन्ही देशांचे नाईल नदीवरील पाण्याचे हक्क सुरक्षित रहायला हवेत. या मुद्यावर इथिओपियाने योग्य व संतुलित भूमिका घेण्याची गरज आहे’, अशा शब्दात अरब लीगचे महासचिव अहमद अबोल घैत यांनी थेट इशारा दिला. त्याचवेळी अरब लीगने इजिप्त व सुदानच्या नाईल नदीवरील हक्कांचे समर्थन करणारा ठराव मंजूर केला आहे, याची आठवणही इथिओपियाला करून दिली.
इथिओपियाचे धरण पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यास इजिप्त व सुदानला त्याचा जबरदस्त फटका बसेल, असा दावा दोन्ही देशांकडून करण्यात येतो. इजिप्तची जवळपास ९० टक्के शेती नाईल नदीच्या पाण्यावर अवलंबून असून इथिओपियाच्या धरणामुळे एक तृतियांश शेती धोक्यात येऊ शकते, असे इजिप्तने म्हटले आहे. सुदानमध्ये शेतीला फटका बसण्याबरोबरच जनतेला मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची भीती आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात या देशांनी धरणाला असलेला विरोध अधिक तीव्र केला आहे. इथिओपियाने लेखी करार करून नदीच्या पाण्याचा प्रवाह कायम राहिल, याची हमी द्यावी अशी मागणी केली आहे.
मात्र गेले दशकभर सुरू असलेल्या चर्चेनंतरही इथिओपियाने लेखी हमी देण्याची तयारी दर्शविलेली नाही. उलट इजिप्त व सुदान चर्चेत अडथळे निर्माण करीत आहेत आणि धरणाच्या मुद्याचा इतर गोष्टींसाठी वापर करीत आहेत, असे आरोप इथिओपियाकडून करण्यात येत आहेत. या आरोपांमुळे इजिप्त व सुदान अधिक आक्रमक झाले असून इथिओपियाविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडी उघडण्याची तयारी सुरू केली आहे. अरब लीगने दिलेला इशारा त्याचाच भाग मानला जातो.
इथिओपियाने २०११ साली नाईल नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला होता. ‘द ग्रँड इथिओपियन रेनेसान्स डॅम’ नावाच्या या धरणासाठी ४.६ अब्ज डॉलर्स खर्च येणार असून सध्या धरणाचे जवळपास ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे मानले जाते. या धरणाचे पाणलोट क्षेत्र १,८७४ किलोमीटर्स इतके प्रचंड असून, त्यात ७४ अब्ज घनमीटर पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. धरणावर जलविद्युत प्रकल्पही उभारला जात असून त्यातून तब्बल सहा हजार मेगावॅट इतकी ऊर्जानिर्मिती होईल, असे सांगण्यात येते.