लंडन – युक्रेन युद्धात जग एका निर्णायक वळणावर आले असून आता हा संघर्ष वाटाघाटींच्या मार्गाने थांबविण्याची वेळ आली आहे, असे आवाहन अमेरिकेतील ज्येष्ठ मुत्सद्दी हेन्री किसिंजर यांनी केले. ‘यापूर्वी आपण रशियाचे आक्रमण रोखण्यासाठी एकत्रित लष्करी मोहिमेचे समर्थन केले होते. आतापर्यंतच्या युद्धातून जे काही धोरणात्मक बदल घडविण्यात यश मिळाले त्या आधारावर नवी चौकट तयार करण्याची गरज असून, त्यासाठी चर्चेच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित होणे गरजेचे आहे’, असे किसिंजर यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री असणाऱ्या किसिंजर यांनी, ब्रिटनमधील ‘स्पेक्टॅटर’ या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखात शांतीप्रस्तावाचे समर्थन केले. मात्र शांतता प्रस्थापित करताना रशियाला कमकुवत करून ठेवणे धोक्याचे ठरेल, असेही किसिंजर यांनी बजावले. त्याचवेळी युक्रेनने रशियन आक्रमणाचा सामना केला असून शांतीप्रक्रियेच्या माध्यमातून युक्रेनला नाटोत सामील करण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत, असा दावाही केला.
किसिंजर यांनी यापूर्वी दोनदा रशिया-युक्रेनसाठी शांतीप्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यात युक्रेनने काही भाग गमावण्याची तयारी ठेवावी, असा सल्ला देण्यात आला होता. त्यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी नाराजीही व्यक्त केली होती.