जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा मोस्ट वाँटेड दहशतवादी तालिब हुसेन याला जिवंत पकडण्यात सुरक्षादलांना यश मिळाले आहे. हा हिजबुल मुजाहिद्दीनसाठी फार मोठा धक्का मानला जातो. हिजबुल मुजाहिद्दीन याआधीच काश्मीर खोऱ्यात संपत आली आहे. तालिब हसन पुन्हा हिजबुलची ताकद वाढविण्यासाठी तरुणांची भरती करीत होता. तसेच खोऱ्यात कमी झालेल्या दहशतवादाला पुन्हा बळ देण्याचे तालिबचे प्रयत्न होते, असा दावा केला जात आहे.
लष्कराच्या राष्ट्रीय रायफलचे जवान, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त करावाईत किश्तवाड जिल्ह्यातील नागसेनी तहसीलमधील त्याच्या घरातून तालिब हसनला ताब्यात घेण्यात आल्याच्या बातम्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने येत आहेत. मात्र तालिबला बंगळुरूमधून अटक करण्यात आल्याचा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. तालिब हा किश्तवाडमधील स्थानिक गुर्जर समुदायाचा असून त्याला येथील डोंगरदऱ्यांमधील दुर्गम मार्गांची चांगली माहिती आहे. त्यामुळे त्याला पडकणे कठिण जात होते. जम्मू-काश्मीर पोलिसांनी तालिबचा समावेश मोस्ट वाँटेड श्रेणीतील ए यादीमध्ये केला होता.
2016 साली तालिब दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. किश्तवाडमध्ये काही भागांमध्ये उघडपणे त्याला शस्त्रास्त्रे घेऊन फिरताना पाहण्यात आले होते. मात्र काही वृत्तांमध्ये तो गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दृष्टीस पडला नसल्याचा दावा केला आहे. तालिब जम्मू-काश्मीरमधून निसटून बंगळुरूला आला व तेथूनच दहशतवादी कारवायांची सूत्रे हलवित होता. सध्या हिजबुलमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांची भरती करण्याची तयारी त्याने सुरू केली होती. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या घरच्यांनी तालिबला दहशतवादाच्या हिंसाचाराच्या मार्गातून बाहेर काढून मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करा, अशी मागणी अनेकवेळा पोलिसांकडे केली होती. त्यामुळे तालिबचा सतत माग काढण्यात येत होता. अखेर तो बंगळुरूत सापडला, असा दावा एका वृत्तामध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान, काश्मिर खोऱ्यात सुरू असलेल्या टार्गेट किलिंगच्या घटना रोखण्यासाठी सुरक्षादलांची सातत्याने कारवाई सुरु आहे. सुरक्षादलांनी गेल्या काही महिन्यात अशा टार्गेट किलिंगमध्ये सहभागी 47 मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आल्याचे जम्मू-काश्मीरचे महासंचालक दिलबाग सिंग यांनी म्हटले आहे. यामध्ये दहशतवाद्यांना विविध सहाय्य पुरविणाऱ्यांनाही अटक करण्यात आल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले. ही कारवाई सतत सुरू आहे. टार्गेट किलिंगमध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सतत सुरू आहे. या दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे दिलबाग सिंग यांनी एका वृत्तमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.