भारतात ३.२ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची जपानची घोषणा

३.२ लाख कोटीनवी दिल्ली – ‘भू-राजकीय परिस्थितीत फार मोठे बदल होत असताना, भारत व जपानच्या संबंधांची खोली अधिकच वाढणे केवळ या दोन देशांसाठीच नाही, तर जगासाठी आवश्यक बनले आहे’, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी भारत-जपान सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा भारताच्या दौर्‍यावर असून त्यांच्याबरोबरील चर्चेनंतर पंतप्रधान मोदी यांनी उभय देशांच्या सहकार्यामध्ये मोठी प्रगती झाल्याचा दावा केला. पंतप्रधान किशिदा यांच्या या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर, जपानने पुढच्या पाच वर्षात भारतामध्ये ३.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर, जगात फार मोठ्या उलथापालथी होत आहेत. विशेषतः इंडो-पॅसिफिक क्षेत्रावरही या युद्धाचा प्रभाव पडत असल्याचे स्पष्ट होत आहे. अमेरिका-नाटोचे लक्ष युक्रेनमधील युद्धाकडे लागलेले असताना, याचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ला चढविल, अशी चिंता जगभरातील विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या हालचाली यामुळे धोकादायक पातळीच्याही पुढे जाऊ शकतात, असे सामरिक विश्‍लेषक सांगू लागले आहेत. यावर नजर ठेवून असलेल्या जपानने भारताबरोबरील आपल्या सर्वच पातळ्यांवरील सहकार्याला विशेष महत्त्व दिल्याचे दिसते आहे.

भारत व जपान यांच्यातील वार्षिक बैठकीसाठी पंतप्रधान किशिदा भारतात आले आहेत. जपानच्या पंतप्रधानपदावर आल्यानंतर ही त्यांची पहिलीच भारतभेट असली, तरी जपानचे परराष्ट्रमंत्री म्हणून याआधी ते अनेकदा भारतात आले आहेत. भारत-जपानच्या सहकार्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे, याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत करून दिली. भारत व जपानचे संबंध लोकशाही, कायद्याचे पालन आणि भक्कम सांस्कृतिक सहकार्यावर आधारलेले आहेत. जपानच्या कंपन्या भारतात फार आधीपासून व्यवसाय करीत आहेत. पुढच्या काळातही जपानच्या कंपन्यांना भारतात व्यवसाय करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी घोषित केले.

पंतप्रधान किशिदा यांच्या या दौर्‍यात जपान भारतात ३.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा झाली. याबरोबरच दोन्ही देशांमध्ये सहा सामंजस्य करार संपन्न झाले आहेत. यामध्ये सायबर सुरक्षा, क्षमता वाढविण्याचे प्रयत्न, माहितीचे आदानप्रदान इत्यादी क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे.

आर्थिक प्रगती व स्थैर्य यासाठी इंधनाचा अव्याहत पुरवठा व इंधनाचे दर नियंत्रणात असणे आवश्यक आहे, याची भारत व जपानला जाणीव आहे. तसेच ऊर्जेच्या स्वच्छ पर्यायासंदर्भात परस्परांना सहकार्य करण्याचाही निर्धार भारत व जपानने केलेला आहे, याकडे पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त निवेदनात लक्ष वेधले. तसेच भारताने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम हाती घेतला असून ‘मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड’सारखे भारताचे उपक्रम अफाट संधी उपलब्ध करून देणारे आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

leave a reply