जपान व फिलिपाईन्समध्ये ‘टू प्लस टू’ चर्चा

- चीनच्या कारवाया व संरक्षण कराराच्या मुद्याला प्राधान्य

टोकिओ/मनिला – चीनच्या वाढत्या वर्चस्ववादी कारवायांच्या पार्श्‍वभूमीवर जपान व फिलिपाईन्सने द्विपक्षीय संरक्षणसहकार्य अधिक भक्कम करण्याचे संकेत दिले आहेत. जपानची राजधानी टोकिओमध्ये पार पडलेल्या ‘टू प्लस टू’ बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती दोन्ही देशांच्या अधिकार्‍यांनी दिली. जपानने गेल्या काही वर्षात चीनविरोधी आघाडी भक्कम करण्यासाठी ‘टू प्लस टू’ चौकटीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत आग्नेय आशियाई देशांबरोबरील सहकार्यासाठीही पुढाकार घेतला असून फिलिपाईन्स हा इंडोनेशियानंतरचा दुसरा आग्नेय आशियाई देश ठरला आहे.

‘टू प्लस टू’ चर्चाशनिवारी टोकियोत झालेल्या बैठकीत जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी व परराष्ट्रमंत्री योशिमासा हयाशी आणि फिलिपाईन्सचे संरक्षणमंत्री डेल्फिन लॉरेन्झना व परराष्ट्रमंत्री तिओदोरो लॉक्सिन ज्यु. यांच्यात व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत चीनकडून साऊथ चायना सी तसेच ईस्ट चायना सीमध्ये सुरू असलेल्या कारवाया तसेच संरक्षण सहकार्य या मुद्यांवर प्राधान्याने बोलणी झाल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. जपान व फिलिपाईन्समध्ये २०१५ साली झालेल्या संरक्षणकराराची व्याप्ती अधिक वाढविण्यावर दोन देशांमध्ये एकमत झाले आहे.

यावेळी दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनात, साऊथ चायना सी क्षेत्रातील एकतर्फी कारवाया व बळाचा वापर याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्र खुले व मुक्त ठेवण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करतील, अशी ग्वाही दिली. साऊथ चायनासीबरोबरच ईस्ट चायना सीमध्ये तणाव वाढविणार्‍या कारवायांना आपला विरोध राहिल, असे दोन्ही देशांनी निवेदनात बजावले.

चीनच्या ‘साऊथ चायना सी’ व नजिकच्या सागरी क्षेत्रातील विस्तारवादी कारवायांवर ‘आसियन’ देशांकडून तीव्र प्रत्युत्तर मिळत आहे. व्हिएतनाम, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर यासारख्या प्रमुख देशांनी चीनचे दडपण झुगारून स्वतंत्र धोरण राबविण्यास सुरुवात केली. फिलिपाईन्सने गेल्या वर्षभरात चीनविरोधातील आक्रमतेची धार अधिकच वाढविली असून संरक्षणखर्चात वाढ करण्याबरोबरच चीनला उघड आव्हान दिले आहे. जपानबरोबरील ‘टू प्लस टू’ चर्चादेखील फिलिपाईन्सच्या आक्रमक चीनविरोधी धोरणाचाच भाग ठरतो.

leave a reply