टोकिओ – जपानच्या सागरी हद्दीजवळ धोकादायकरित्या वावरणार्या विनाशिकांना लक्ष्य करण्यासाठी लांब पल्ल्याच्या विनाशिकाभेदी क्षेपणास्त्रांची निर्मिती करीत असल्याची घोषणा जपानने केली. ‘‘ईस्ट चायना सी’मधील सुरक्षाविषयक परिस्थिती फारच अवघड बनली आहे आणि या परिस्थितीला उत्तर देणे जपानसाठी तितकेच आवश्यक ठरते’’, असे जपानचे संरक्षणमंत्री नोबुओ किशी यांनी यावेळी जाहीर केले. संरक्षणमंत्री किशी यांनी उघडपणे उल्लेख केला नसला तरी चीनच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, जपान आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता वाढवित असल्याचे उघड आहे.
पंतप्रधान योशिहिदे शुगा यांनी सत्तासूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच जपानच्या संरक्षण धोरणात मोठा बदल केला आहे. यानुसार जपान विनाशिका आणि लढाऊ विमानातून मारा करणार्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार आहे. याआधीपासून जपानच्या संरक्षणदलांकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या मारक क्षमतेत वाढ केली जाणार आहे. यामुळे ‘ईस्ट चायना सी’च्या क्षेत्रातील द्विपसमुहांच्या सुरक्षेसाठी जपानकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या सामर्थ्यात वाढ होईल, असा दावा केला जातो.
जपानचे संरक्षणमंत्री किशी यांनी देखील संरक्षण धोरणातील या बदलाची माहिती दिली. यासाठी संरक्षणमंत्री किशी यांनी ओकिनावा द्विपसमुह तसेच ‘ईस्ट चायना सी’च्या क्षेत्रात जपानच्या बेटांच्या सुरक्षेला असलेल्या धोक्याची आठवण करुन दिली. याआधीच जपानने ओकिनावा द्विपसमुहावरील तळावर २०० किलोमीटर मारा करणार्या विनाशिकाभेदी क्षेपणास्त्राची तैनाती केली आहे. अशा परिस्थितीत, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमुळे जपानच्या ‘ए२एडी’ अर्थात ‘एन्टी एक्सेस एरिया डिनायल’ सागरी क्षेत्रातील परदेशी जहाजांचा स्वैर वावर रोखता येईल, असा दावा जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी केला.
या व्यतिरिक्त, चीनमधील तळांपर्यंत मारा करणार्या क्रूझ् क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठीही जपानचे प्रयत्न सुरू आहेत. हवेतून जमिनीवर मारा करणार्या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठीही जपान प्रयत्न करणार आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्रांच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी संबंधित क्षेपणास्त्रांचा वापर करता येईल, असे संकेत जपानने दिले आहेत. त्याचबरोबर जपानच्या नव्या विनाशिकांवर जुन्या ‘एजिस’ रडारच्या ऐवजी अतिप्रगत ‘एजिस’ रडार यंत्रणा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती जपानच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी दिली. ‘ईस्ट चायना सी’मधील सेंकाकू द्विपसमुहासह काही भूभाग आपल्या मालकीचा असल्याचा दावा चीन करीत आहे. या द्विपसमुहांच्या क्षेत्रात विनाशिका, तटरक्षकदलाची जहाजे तसेच मच्छिमार नौका रवाना करून चीन जपानला आव्हान देत आला आहे. गेल्याच आठवड्यात या सागरी क्षेत्रात जपानच्या बेटांना चीनच्या विनाशिकांपासून धोका असल्याचे जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले होते. चीनच्या संरक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत सेंकाकू द्विपसमुहावर जपानचाच सार्वभौम अधिकार असल्याचे किशी यांनी ठणकावून सांगितले होते. या द्विपसमुहांच्या हद्दीतील चीनची घुसखोरी व याबाबत चीन देत असलेले खुलासे कधीही स्वीकारणार नसल्याचे किशी यांनी बजावले होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री किशी यांनी स्वतंत्र आणि मुक्त ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्रातील सहकार्यासाठी जर्मनीने देखील आपली विनाशिका या सागरी क्षेत्रात रवाना करावी, असे आवाहन केले होते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये सहकार्य असून ब्रिटन व फ्रान्सने देखील या क्षेत्रात विनाशिका रवाना केल्या आहेत. भारत-अमेरिका व मित्रदेशांच्या या हालचालींवर चीनने नाराजी व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत, जपानने जर्मनीलाही या क्षेत्रात विनाशिका रवाना करण्याचे आमंत्रण देऊन चीनची डोकेदुखी वाढविल्याचे दिसत आहे.