तैवानमध्ये ज्युईश सांस्कृतिक केंद्र सुरू

- तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते उपस्थित

तैपेई – तैवानची राजधानी तैपेईमध्ये बहुउद्देशीय ज्यूधर्मियांचे सांस्कृतिक केंद्र सुरू झाले. ‘तैवानी आणि ज्यू मानवाधिकार व स्वातंत्र्याच्या मुल्यांचा आदर करतात. त्यामुळे सदर केंद्र तैवानी आणि ज्यूच्या संस्कृतीमधील समन्वय वाढविणारे ठरेल`, असा विश्‍वास तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते यांनी व्यक्त केला. तर हे ठिकाण ज्यू आणि तैवानी जनतेला अधिक जवळ आणेल, असा दावा या केंद्राची स्थापना करणारे उद्योगपती जेफ्री डी. श्‍वार्ट्झ यांनी केला. तैवानमधील ज्यूधर्मियांचे हे केंद्र म्हणजे इस्रायल व तैवानमधील सहकार्य जगजाहीर करण्याची सुरूवात असल्याचे दिसते आहे.

तैवानमध्ये ज्युईश सांस्कृतिक केंद्र सुरू - तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते उपस्थितगेली काही वर्षे तैवानमध्ये आपला व्यवसाय वाढवणारे उद्योजक जेफ्री श्‍वार्ट्झ यांनी गेल्या आठवड्यात ज्युईश सांस्कृतिक केंद्राची निर्मिती केली. आपली संस्कृती, परंपरा, शिक्षण आणि धार्मिक प्रथा यांची ओळख करून देण्यासाठी या केंद्राची स्थापना केल्याचे श्‍वार्ट्‌‍झ यांनी स्पष्ट केले. पण ही बाब सांस्कृतिक केंद्राच्याही पलिकडे असून तैवानी जनतेचे सामर्थ्य आणि ज्यू जनतेचे गुण यांना एकत्रिकरण करण्यासाठी याचा वापर होईल, असा महत्त्वपूर्ण दावा श्‍वार्ट्झ यांनी केला.

‘जगभरातील ज्यूधर्मियांनी फॉर्मोसा बेटाची मुल्ये आणि सौंदर्य पहावे. त्याचबरोबर तैवानसाठी जागतिक व्यवहारांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी आमची इच्छा आहे`, असे श्‍वार्ट्झ म्हणाले. साधारण शतकापूर्वी युरोपिय दर्यावर्दींनी तैवानचा उल्लेख फॉर्मोसा असा केला होता. अगदी दुसऱ्या महायुद्धापर्यंत काही व्यवहारांमध्ये तैवानचा उल्लेख फॉर्मोसा असाच होत होता. त्यामुळे ज्युईश उद्योजकांनी तैवानचा जुन्या नावाने उल्लेख करून निराळेच संकेत दिल्याचे दिसत आहे.

तैवानमधील इस्रायलचे प्रतिनिधी ओमेर कॅस्पी यांनी देखील ज्युईश सांस्कृतिक केंद्राच्या निर्मितीचे स्वागत केले. तैवानमध्ये ज्युईश सांस्कृतिक केंद्र सुरू - तैवानचे उपराष्ट्राध्यक्ष लाई चिंग-ते उपस्थिततैवानमधील ज्यूधर्मियांसाठी ही लक्षणीय बाब असल्याचे कॅस्पी म्हणाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जगभरात ज्या काही मोजक्या ठिकाणी ज्युधर्मिय सुरक्षित होते, त्यात तैवानचा समावेश आहे. त्यामुळे सदर केंद्र इस्रायलचे तैवानमधील हितसंबंधांचे प्रतिनिधीत्व करणारे ठरते, असे कॅस्पी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर तैवान आणि इस्रायलने परस्परांना मान्यता दिलेली नाही. तरीही दोन्ही देशांमध्ये आर्थिक व व्यापारी सहकार्य आहे. याशिवाय इस्रायल आणि तैवानमध्ये छुपे लष्करी सहकार्य असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. इस्रायलने तैवानला ‘अर्थ रोमिंग ऑब्झर्व्हेशन सिस्टीम` पुरविल्याचे दावे झाले होते. पण दोन्ही देशांनी याबाबत कधीही कबुली दिली नाही.

दरम्यान, गेल्या काही आठवड्यांपासून चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायलच्या विरोधात भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. पॅलेस्टाईन तसेच इराणच्या मुद्यावर चीन इस्रायलविरोधी आघाडीत सहभागी झाल्याचे गेल्या वर्षी उघड झाले होते. त्याचबरोबर इस्रायलवर झालेल्या सायबर हल्ल्यांमागे चीन असल्याचा आरोपही झाला होता. तर गेल्या महिन्यात अमेरिका व लिथुआनियातील ज्युईश गटांनी झिंजियांगमधील उघुरवंशियांवरील अत्याचाराप्रकरणी चीनविरोधात आक्रमक भूमिका स्वीकारली होती. अमेरिकेतील बायडेन प्रशासन व आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनविरोधात कारवाई करावी, अशी मागणी या ज्युईश गटांनी केली होती.

leave a reply