अम्मान – आत्तापर्यंत अमेरिका व इस्रायलचे सिरियावरील हल्ले लक्षवेधी ठरले होते. पण सोमवारी जॉर्डनने सिरियात चढविलेल्या हवाई हल्ल्यांनी जगाचे लक्ष वेधले आहे. जॉर्डनच्या हवाईदलाने सिरियातील इराणसंलग्न अंमली पदार्थांच्या कारखान्यावर कारवाई केली. डेरा शहरात केलेल्या या कारवाईत कुख्यात सिरियन तस्कर ठार झाल्याचा दावा मानवाधिकार संघटना करीत आहेत. जॉर्डनसह अरब देशांनी सिरियाला अरब लीगमध्ये सामील केल्यानंतर जॉर्डनने ही कारवाई केली आहे.
सिरियाच्या दक्षिणेकडील डेरा शहरात खारब अल-शाहेम या भागात इराणसंलग्न अंमली पदार्थांचा कारखाना आहे. या कारखान्यातून सिरिया व जॉर्डनच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. मरी अल-रमथान हा इराणसंलग्न सिरियन तस्कर या कारखान्याचा मालक होता. या तस्करीसाठी लेबेनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेकडूनही मरीला सहाय्य मिळत होते.
या कारखान्यात कॅप्टागॉन नावाचे अंमली पदार्थाची निर्मिती केली जात होती. याच्या तस्करीतून मिळणारे अब्जावधी डॉलर्स सिरियन राष्ट्राध्यक्ष बशर अल-अस्साद व त्यांच्या सहकाऱ्यांना मिळत होते, असा आरोप पाश्चिमात्य देशांनी केला होता. सिरियन राजवटीने हे आरोप फेटाळले होते. पण हा कारखाना व अंमली पदार्थांची ही तस्करी जॉर्डनच्या सुरक्षा यंत्रणेसाठी आव्हान ठरत होती.
या पार्श्वभूमीवर, सोमवारी जॉर्डनच्या हवाईदलाने सिरियाच्या डेरा शहरातील या कारखान्यावर हल्ला चढविला. यामध्ये मरी व त्याच्या कुटुंबातील काही सदस्यही मारले गेले. जॉर्डनची ही कारवाई सिरियातील इराणसंलग्न अंमली पदार्थांच्या तस्करीला हादरा देणारी असल्याचा दावा केला जातो. काही तासांपूर्वीच अरब देशांनी सिरियाला आपल्या संघटनेत नव्याने सामील करुन घेतले होते. त्यानंतर अवघ्या काही तासात जॉर्डनने ही कारवाई केल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमे लक्षात आणून देत आहेत.
हिंदी