वॉशिंग्टन – इस्रायल आणि अरब देशांमधील अब्राहम करारासाठी प्रयत्न करणारे जॅरेड कश्नर यांनी सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यात सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आणि जावई कश्नर यांच्या ‘खाजगी इक्विटी फंड’ने सौदीचा सुमारे दोन अब्ज डॉलर्स इतका निधी इस्रायलमध्ये गुंतवण्याची तयारी केली आहे. यामुळे पहिल्यांदाच इस्रायल आणि सौदीमध्ये व्यापारी सहकार्य प्रस्थापित होणार आहे.
इस्रायलच्या दोन स्टार्ट अप्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी जॅरेड कश्नर यांच्या ‘ॲफिनिटी पार्टनर्स’ कंपनीने तीन अब्ज डॉलर्सचा निधी जमा केला आहे. यापैकी दोन अब्ज डॉलर्सचा निधी सौदीतून मिळाल्याचे ‘वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकन दैनिकाने सांगितले. सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि काही सौदी अधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर इस्रायली स्टार्ट अप्ससाठी हा निधी मोकळा करण्यात आल्याचे या दैनिकाने म्हटले आहे.
‘या क्षेत्रातील इस्रायली आणि इस्लामधर्मियांना व्यवसायासाठी एकत्र आणू शकलो तर त्यांचे हितसंबंध व मूल्य एकमेकांशी जोडली जातील’, अशी अपेक्षा कश्नर यांनी अमेरिकन दैनिकाशी बोलताना व्यक्त केली. यामुळे सौदी अरेबिया पहिल्यांदा जाहीररित्या इस्रायलमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे या दैनिकाने अधोरेखित केले. इस्रायलबरोबर उघड राजनैतिक सहकार्य नसतानाही सौदीची ही गुंतवणूक अतिशय लक्षवेधी ठरते, असे या दैनिकाचे म्हणणे आहे.
मार्च महिन्यात क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकन मासिकाशी बोलताना इस्रायल सौदीचा शत्रू देश नसल्याचे म्हटले होते. तसेच पॅलेस्टाईनचा मुद्दा निकालात निघाला तर इस्रायलबरोबर सहकार्य प्रस्थापित होऊ शकेल, अशी शक्यताही सौदीच्या क्राऊन प्रिन्सनी व्यक्त केली.