जीनिव्हा – राजकीय अस्थैर्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या लेबेनॉनवर भीषण मानवतावादी संकट कोसळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अन्नधान्य आणि इंधनाची टंचाई लेबेनॉनमधील संकट अधिकच भयावह बनवित आहे. त्यामुळे येत्या काळात लेबेनॉनमधील उपासमार व कुपोषणाची समस्या अधिकच भयंकर बनेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला.
गेल्या वर्षापासून लेबेनॉन सामाजिक आणि आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. लेबेनॉनची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी फ्रान्सने सहाय्य केले होते. पण याचा फार मोठा लाभ लेबेनॉनच्या अर्थव्यवस्थेला झालेला नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने लेबेनॉनसाठी नियुक्त केलेल्या विशेषदूत नजात रोश्दी यांनी जीनिव्हा येथील बैठकीत लेबेनॉनमधील परिस्थितीबाबत आपले निरिक्षण मांडले.
युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात निर्माण झालेल्या अन्नधान्य व इंधनाच्या टंचाईचा भीषण परिणाम आधीच गाळात रुतलेल्या लेबेनॉनवर होत असल्याची चिंता रोश्दी यांनी व्यक्त केली. लेबेनॉनमधील सुमारे 22 लाख जणांना तातडीच्या अन्नसुरक्षेची आवश्यकता आहे. लेबेनॉनची जनसंख्या 69 लाख इतकी आहे. यातील सुमारे एक तृतियांश जनतेवर उपासमारीचे संकट कोसळू शकते, असे रोश्दी बजावले आहे.
तर या देशातील एक तृतियांश जण बेरोजगार असून यातील तरुणांची संख्या 50 टक्के इतकी असल्याचे रोश्दी यांनी म्हटले आहे. जागतिक बँकेने लेबेनॉनचे सकल राष्ट्रीय उत्पादन 6.5 टक्क्यांनी कमी होईल, असा इशारा याआधीच दिला होता, याकडे रोश्दी यांनी लक्ष वेधले. यामुळे लेबेनॉन कोलमडण्याची दाट शक्यता समोर येत आहे. या आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी आवश्यक असलेले राजकीय स्थैर्य लेबेनॉनमध्ये नाही, ही सर्वात घातक बाब ठरणार आहे.