नसरल्लाच्या चुकीची किंमत लेबेनॉनला चुकवावी लागेल

- इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांचा इशारा

बैरूत – ‘हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याला कारिश प्रकल्पाला नुकसान पोहोचवायचे असेल तर त्याने खुशाल तसे करावे. पण याची किंमत लेबेनॉनला चुकवावी लागेल, हे ध्यानात ठेवावे’, असा सज्जड इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिला. भूमध्य समुद्रातील कारिश इंधनप्रकल्पाचा वाद सोडविण्यासाठी इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये चर्चा सुरू आहेत. पण हिजबुल्लाहच्या प्रमुखाकडून सातत्याने इस्रायलच्या हद्दीतील कारिश प्रकल्पावर हल्ले चढविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. नसरल्लाच्या या धमक्यांना उद्देशून इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी हा इशारा दिला.

Gantz Nasrallahइस्रायलमधील रिशमन युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या दहशतवादविरोधी परिसंवादात बोलताना संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इस्रायल आणि लेबेनॉनच्या सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेची माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या मध्यस्थीने दोन्ही देशांमध्ये ही चर्चा सुरू आहे. याद्वारे भूमध्य समुद्रातील कारिश प्रकल्पातून इस्रायल आणि लेबेनॉनला आर्थिक तसेच इंधनाच्या दृष्टीने फायदा होणारा असेल, तर त्यासाठी इस्रायल तयार असल्याचे गांत्झ म्हणाले. या प्रकरणी रविवारपर्यंत पार पडलेल्या चर्चेला यश मिळाल्याचा दावा केला जातो. पण कारिश प्रकल्पाबाबत इस्रायल आणि लेबेनॉनच्या सरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेला हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाने विरोध केला होता. कारिश क्षेत्रावर आणि येथे सुरू असलेल्या उत्खननावर लेबेनॉनचा पूर्ण अधिकार असल्याचा दावा हिजबुल्लाहच्या प्रमुखाने केला होता. त्याचबरोबर इस्रायलने या क्षेत्रावरील अधिकार सोडला नाही, तर इस्रायली प्रकल्प आणि जहाजांवर हल्ले चढविण्याची धमकी नसरल्लाने दिली होती. काही दिवसांपूर्वीच इस्रायलच्या नौदलाने कारिश प्रकल्पाच्या दिशेने प्रवास करणारे हिजबुल्लाहचे हल्लेखोर ड्रोन पाडले होते.

या पार्श्वभूमीवर, सदर प्रकल्पाबाबत लेबेनॉनबरोबर सुरू असलेल्या चर्चेचा उल्लेख करताना, संरक्षणमंत्री गांत्झ यांनी हिजबुल्लाहला इशारा दिला. इस्रायलच्या हद्दीतील कारिश प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी इस्रायल सज्ज आहे. इस्रायलच्या सर्व यंत्रणा सावध आणि प्रतिहल्ल्यासाठी सज्ज असल्याचे गांत्झ यांनी स्पष्ट केले. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार इयल हुलाता यांनी देखील लेबेनॉनच्या सरकारबरोबर सुरू असलेल्या चर्चेचे समर्थन केले. लेबेनॉनमध्ये स्थैर्य आणणे आणि हिजबुल्लाहच्या प्रभावात कपात करणे, हे या चर्चेतील इस्रायलचे उद्दीष्ट असल्याचे हुलाता यांनी स्पष्ट केले.

भूमध्य समुद्रात पसरलेल्या ८६० चौरस किलोमीटर कारिशच्या इंधन क्षेत्रावर इस्रायल आणि लेबेनॉन आपला हक्क सांगत आहेत. यापैकी आपल्या हद्दीतील क्षेत्रातून इस्रायलने इंधनवायूचे उत्खनन सुरू केले आहे. यासाठी इस्रायलने ब्रिटिश कंपनीला परवाना दिला होता. पण या वादग्रस्त सागरी क्षेत्रात उत्खनन सुरू करून इस्रायलने आमच्या सागरी क्षेत्राचे उल्लंघन केल्याचा आरोप लेबेनॉनने केला होता. हा वाद पेटल्यानंतर अमेरिकेने इस्रायल आणि लेबेनॉनमध्ये मध्यस्थी सुरू केली होती.

दरम्यान, हिजबुल्लाहचे दहशतवादी कारण काढून इस्रायलवर हल्ले चढविण्याच्या तयारीत असल्याचा इशारा इस्रायली विश्लेषक देत आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांनी कारिश प्रकल्पावर ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. तर या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्नही केला होता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्‌‍सच्या प्रमुखांनी हिजबुल्लाहच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर या घटनांमध्ये वाढ झाल्याचा दावा केला जातो.

leave a reply